नवी दिल्ली- ईडीकडून ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या प्रकरणात (dnyanradha multistate news) कारवाईचा फास आणखी आवळला जाणार आहे. ईडी कोठडीची मुदत संपत असल्यानं उद्योगपती सुरेश कुटेला मुंबईच्या विशेष न्यायालयात आज हजर केलं जाण्याची शक्यता आहे.
उद्योगपती सुरेश कुटे याच्यावर २४०० कोटींचे मनी लाँड्रिंग आणि ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमधून सुमारे ४ लाख छोट्या गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. उद्योगपतीनं गुन्ह्यातून मिळविलेल्या पैशांचा वापर करून नवीन मालमत्ता घेतल्याचं ईडीच्या तपासात समोर आलं आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेटचे (डीएमसीएसएल) इतर खात्यांमध्ये पैसे वळवल्याप्रकरणी ईडीनं मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), २००२ च्या तरतुदींनुसार कुटे याला ७ जानेवारी रोजी अटक केली. उद्योगपतीला मुंबईच्या विशेष न्यायालयात (पीएमएलए) हजर करण्यात आल्यानंतर कुटेला शुक्रवारपर्यंत ईडी कोठडी देण्यात आलेली आहे. ही कोठडी आज संपत आहे.
कुटे आणि इतरांनी गुंतवणूकदारांशी केलेल्या फसवणुकीसंदर्भात, मे ते जुलै २०२४ पर्यंत राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये आयपीसी, १८६० आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण (वित्तीय आस्थापनांमध्ये) कायदा, १९९९ च्या विविध कलमांखाली गुन्हे नोंदविलेले आहेत. या गुन्ह्यातील नोदींनुसार ईडीनं तपास सुरू केला. डीएमसीएसएलचे व्यवस्थापन आणि नियंत्रण सुरेश ज्ञानोबाराव कुटे, यशवंत व्ही. कुलकर्णी आणि इतरांनी केल्याचा ईडीनं आरोपामध्ये म्हटलं आहे. या पतसंस्थेनं विविध ठेव योजना सुरू करताना गुंतवणूकदारांना १२ ते १४ टक्के व्याज देण्याचा दावा देण्याचा केला.
ईडीला तपासात काय आढळले?
- सुरेश कुटे आणि इतरांनी चार लाखांहून अधिक छोट्या गुंतवणूकदारांना जास्त परताव्याचं आमिष दाखवित त्यांच्याकडून ठेवी जमा केल्या होत्या, असे ईडीला तपासात आढळून आलं.
- प्रत्यक्षात ठेवीची मुदत संपल्यानंतर अनेक गुंतवणूकदारांना पैसे देण्यात आले नाहीत.
- गुंतवणुकदारांची आर्थिक फसवणूक करत सोसायटीच्या व्यवस्थापनानं डीएमसीएसएलच्या निधीचा अपहार केला. यामध्ये सुरेश कुटे आणि इतरांनी कर्जाच्या नावाखाली सुमारे २,४७० कोटी रुपयांचा निधी बेकायदेशीरपणे आणि फसवणुकीनं इतर वळविण्याचा गुन्हेगारी कट रचला होता.
- फसवणूक करत परस्पर कर्जाच्या रकमा कुटे ग्रुपच्या अनेक संस्थांच्या खात्यांवर आणि थेट रोख स्वरूपात पैसे वळविण्यात आले.
- सोसायटीकडून मिळालेल्या निधीचा वापर कुटेकडून वैयक्तिक खर्चासाठी वापर करण्यात आला. त्याचबरोबर नवीन व्यवसायांमध्ये गुंतवणूक, मालमत्ता खरेदी करण्यासाठी सोसायटीमधील पैसे वापरण्यात आले.
यापूर्वी काय कारवाई झाली?ज्ञानराधा मल्टीस्टेट ही राज्यात एकूण ५२ शाखा असलेली मोठी मल्टीस्टेट पतसंस्था म्हणून ओळखली जात होती. पोलिसांनी ऑगस्ट २०२४ मध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार पतसंस्थेत ठेवीदार आणि बचत खातेदारांचे सुमारे ३ हजार ७१५ कोटी ५८ लाख रुपये अडकले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेनं यापूर्वी कुटे यांच्या मालकीच्या एकूण ५ हजार ७६५ कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. उद्योगपती आणि त्याची पत्नी अर्चना कुटे यांच्या मालकीच्या २३८ मालमत्ता आहेत. यापूर्वीच पोलिसांनी निंबोरे (जि.सातारा) शिवारातील ६५ एकर जागेवरील कुटे सन्स डेअरीज कंपनी, इतर इमारती, यंत्रसामग्री आणि शेजारी असलेला पेट्रोल पंप अशी अंदाजित ४२०० कोटींची मालमत्ता जप्त केली.
हेही वाचा-