मुंबई - विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांकडून आढावा बैठका घेण्यात येत आहेत. राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवरदेखील राजकीय पक्षांकडून निवडणुकीची तयारी करण्याकरिता बैठकांचं सत्र सुरू आहे. अशातच राष्ट्रवादीच्या (SP) बैठकीत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं केलेलं कौतुक आणि जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी हे राजकीय चर्चेचा विषय ठरले आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार)ची गुरुवारी आढावा बैठक मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी थेट शरद पवार यांच्यासमोरच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. जयंत पाटील हे अजित पवारांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा असल्यानं कार्यकर्त्यांनी थेट त्यांच्या राजीनामाची मागणी केली. यावर जयंत पाटील यांनी 8 दिवसांचा वेळ मागितला. निवडणूक काळात बूथ लेवलवर पक्षाला किती मतदान झालं, असं विचारत राजीनामा मागणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्षांनी आव्हान दिलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कार्यकर्त्यांना वेळ देणारा, त्यांचं म्हणणं ऐकून पक्ष मजबूत करणाऱ्याला प्रदेशाध्यक्ष करावे, अशी राष्ट्रवादीच्या (एसपी) पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. आमदार रोहित पवार आणि रोहित पाटील या तरुणांना संधी मिळावी, अशी मागणी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे. तरुणांच्या हाती नेतृत्व सोपविल्याशिवाय पक्ष मजबूत होणार नाही, असे या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. सोबतच, प्रत्येक जिल्ह्याच्या कार्यकारिणीच्या बैठकीची तारीखदेखील निश्चित करावी. त्या बैठकीला संबंधित जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची उपस्थिती बंधनकारक करावी, अशी मागणीही पदाधिकाऱ्यांकडं शरद पवारांकडे केली आहे.
आठ दिवसांमध्ये भाकरी परतणार?- शरद पवारांसमोरच कार्यकर्ते आक्रमक झाल्यानं जयंत पाटीलदेखील काहीसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार, कार्यकर्त्यांच्या मागणीवर जयंत पाटील यांनीदेखील कार्यकर्त्यांना आव्हान दिल्याची माहिती मिळत आहे. जयंत पाटील म्हणाले की, "मी एकटा किती दिवस काम करणार? बोलणे खूप सोपं आहे. पण, चांगला माणूस मिळणं अवघड आहे. केवळ जोरदार आक्रमक भाषणांनी पक्ष चालवता येत नाही. येत्या दोन दिवसांत प्रत्येकानं आपल्या प्रभागात पक्षाला किती मतदान झालं? याची आकडेवारी द्यावी. यानंतर मी आठ दिवसांत प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देईन."
- पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदलण्यावरून पक्षात मतभेद?राष्ट्रवादी कॉंग्रेस (एसपी)चे प्रदेशाध्यक्ष बदलण्याची राजकीय चर्चा सुरू असताना माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी नवीन लोकांना प्रमोशन दिलं पाहिजे, असं मत व्यक्त केलं होतं. तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जयंत पाटील तीन वर्षे प्रदेशाध्यक्ष पदी राहतील, असा विश्वास व्यक्त केला त्यांना पाठिंबा दिला होता.
राष्ट्रवादीत (SP) फेरबदल होणार? लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत आपण बेफिकीर राहिलो, अशी जाहीर कबुली राष्ट्रवादीचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. ओबीसीपर्यंत केलेल्या प्रयत्नांची माहिती पोहोचवण्यात अपयशी ठरलो, असंही पवार यांनी म्हटलं. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षाकडून ५० टक्के नवीन चेहऱ्यांना तिकिटे दिली जातील, असे पवार यांनी सभेत जाहीर केलं. पक्षाला बळकटी देण्यासाठी संघटनेत फेरबदल केले जातील, असे त्यांनी संकेत दिले.
शरद पवारांकडून आरएसएसचं कौतुक- भाजपाकडून शरद पवार यांच्यावर सातत्यानं टीका करण्यात येते. मात्र, भाजपाची मातृसंस्था अशी ओळख असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवक संघांचं शरद पवार यांनी कौतुक केलं. पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना माजी केंद्रीय मंत्री पवार म्हणाले, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये (आरएसएस) हिंदुत्व संघटनेच्या विचारसरणीशी निष्ठा दाखविणारे कार्यकर्ते आहेत. ते कधीही त्यांच्या मार्गापासून विचलित होत नाहीत. आपल्याकडेही छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचारसरणीशी वचनबद्ध असणारा कार्यकर्ता असायला हवा."
शरद पवारांकडून सोशल इंजिनिअरिंगवर भर- बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परभणी जिल्ह्यातील न्यायालयीन कोठडीत मागासवर्गीय व्यक्तीचा मृत्यू झाल्यानं चिंता व्यक्त आहे. त्यावर बोलताना शरद पवार यांनी समाजातील जातीय तेढ संपविण्यासाठी सोशल इंजिनिअरिंगची गरज व्यक्त केली आहे. ते म्हणाले, " मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या वेळीही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा मी मुख्यमंत्री असताना विद्यापीठात जाऊन संबंधितांशी संवाद साधला होता. लोकांशी संवाद साधण्यासाठी आणि सोशल इंजिनिअरिंगकरिता पावले उचलण्याची आवश्यकता आहे."
हेही वाचा-