नांदेड- सह्याद्री पर्वत रांगाच्या घनदाट जंगलात अनेक प्राण्यांचा मुक्त संचार आहे. त्यातील काही प्राणी जंगलात शिकार नसल्यानं बऱ्याचदा शहरी वस्तीकडे वळतात. माहूरमध्येही बिबट्या हा हिंस्र प्राणी आता जंगलाचा भाग सोडून मुख्य रस्त्यावर फेर्या घालत असल्याचे रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पाहायला मिळाले. रेणुका देवी मंदिर रस्त्यावरील गायमुखमधल्या भर रस्त्यावर बिबट्याची जोडी ऐटीत बसल्याचं येथील व्यापार्यांच्या निदर्शनास आलंय.
व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल : माहूरमधील दत्तशिखर रोड बिबट्याच्या जोडीचा मुक्त संचार 8 जानेवारी रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास नागरिकांना पाहण्यास मिळाला. या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झालाय. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलंय. माहूर ते दत्तशिखर रोडवर बुधवारी रात्री 10 वाजता बिबट्याच्या जोडीने रस्त्यावर ठाण मांडले. बिबट्यानं दत्तशिखरच्या पलीकडे गावे असणाऱ्या नागरिकांची वाट काही वेळ रोखली. माहूर ते दत्तशिखर रस्ता हा जंगलातून जात असल्याने नेहमीच रात्रीच्या वेळी इथे सर्रास जंगली श्वापद पाहायला मिळतात.
रस्त्यावरून प्रवास करीत असताना नागरिकांनी सावधानता बाळगावी : बिबट्या, अस्वले, रानडुकरे आणि नीलगायी रस्त्यावर संचार करीत असतात. विशेष म्हणजे यापूर्वीसुद्धा बऱ्याचदा नागरिकांना बिबटे, अस्वल, रान डुकरे आणि नीलगायी यांचं दर्शन घडलंय. या रस्त्यावरूनच तालुक्यातील दत्तमांजरी, वझरा शे. फ. मांडवा, पानोळा, वानोळा, अंजनी पावनाळा, बोरवाडी, पाचोंदा, कुपटी साकुर दहेगाव आणि इतर गावांच्या नागरिकांना ये-जा करावी लागते. याबाबत वनविभागाशी संपर्क साधला असता रात्रीच्या वेळी रस्त्यावरून प्रवास करीत असताना नागरिकांनी सावधानता बाळगावी आणि बिबट्या अथवा दुसरे हिंस्र प्राणी आढळल्यास वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन माहूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांनी केलंय.
हेही वाचा-