बीड : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्या महिन्यात निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकणातील आरोपी विष्णू चाटे याला आज (10 जाने.) न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयानं त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
काय म्हणाले सरकारी वकील? : यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सरकारी वकील जितेंद्र शिंदे म्हणाले, "संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी ज्या खंडणीच्या प्रकरणाचा संबंध जोडला आहे. त्यातील आरोपी विष्णू चाटे याला आज केज येथील न्यायालयात हजर केलं असता तपासी अधिकाऱ्यांच्या वतीनं आरोपीच्या न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात आली. त्यानुसार न्यायमूर्ती एस व्ही पावसकर यांनी आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे."
आरोपींचे वकील काय म्हणाले? : यावेळी बोलत असताना आरोपींचे वकील म्हणाले, "विष्णू चाटेवर दाखल असलेल्या खंडणी प्रकरणातील तपासी अधिकाऱ्यांच्या वतीनं त्यांचे वकील शिंदे यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली." त्यामुळं विष्णू चाटे आता जामीन मिळण्यास पात्र आहे. मात्र, आरोपीच्या वतीनं वकिलानं अद्यापपर्यंत जामीन अर्ज न्यायालयात सादर केलेला नाही.
मानव अधिकार आयोगात गुन्हा दाखल : संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकारी आयोगानं स्वतंत्रपणे चौकशी करावी, अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी दिल्ली येथे आयुक्तांची भेट घेऊन केली होती. तसंच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना अमानवी आहे. यात मानव अधिकारांचं उल्लंघन झाल्यामुळं या प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं दखल घ्यावी, असंही ते म्हणाले होते. त्यानंतर आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं खासदारांची विनंती मान्य करुन मस्साजोग प्रकरणात गुन्हा क्र.33/13/5/2025 अन्वये गुन्हा दाखल करुन घेतलाय. तसंच या गुन्ह्यामधील तपास पोलीस आणि न्यायव्यवस्था यावर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचं सुद्धा लक्ष असेल. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जिल्ह्यामध्ये तातडीनं टीम पाठवून कारवाई करणार आहे. शिवाय या संपूर्ण घटनेचा अहवाल मागवणार असून ही टीम दिल्ली येथील असेल.
हेही वाचा -
- संतोष देशमुख हत्या प्रकरण: "धनंजय मुंडे यांचं नाव डायरेक्ट...", नेमंक काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
- उत्तम जानकरांची धनंजय मुंडेंवर टीका; महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर मैदानात, म्हणाल्या 'वैचारिक मानसिकता खालावली'
- संतोष देशमुख हत्याकांड; बीड प्रकरणावरुन धनंजय मुंडेंना लक्ष्य करणं चुकीचं: लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना टोला, 'हा' दिला इशारा