मुंबई Majhi Ladki Bahin Yojana : राज्य सरकारनं जाहीर केलेली 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना निधी अभावी रखडण्याची शक्यता विरोधकांसह अनेक तज्ञांनी व्यक्त केली होती. या योजनेमुळं राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार येणार असल्यानं ती किती काळ चालेल आणि निधी कसा उपलब्ध होईल अशी चिंता व्यक्त करण्यात येत होती. अखेर अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या योजनेसाठी निधीची तरतूद केली असल्याचं स्पष्ट करत, विरोधकांच्या प्रश्नांना पूर्णविराम दिला.
राज्याचा उपमुख्यमंत्री आणि अर्थ व नियोजन मंत्री म्हणून मी स्वतःच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना राज्याच्या वर्ष 2024-25 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात सादर केली आहे. वित्त व नियोजन, सर्व संबंधित विभाग तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच या योजनेची घोषणा मी राज्याच्या अर्थसंकल्पात केली.- अजित पवार, अर्थमंत्री
वित्त विभागाचा विरोध असल्याची बातमी खोटी : "या संदर्भातील बातम्या वस्तुस्थितीशी विसंगत आहेत. त्या राजकीय हेतूने प्रेरित केल्या जात आहेत. प्रसारमाध्यमांनीही अशा बातम्या देणं कृपया थांबवावे. या योजनेवर रक्कम खर्च करण्याची राज्य शासनाची तयारी आहे. त्यामुळं 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'ला या राज्यातील कुणाचाही विरोध असण्याचे कारण नाही, असूच शकत नाही," अशी पोस्ट अजित पवार यांनी 'एक्स'वर शेयर केली.