मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावर निवडणूक आयोगाचं बारीक लक्ष आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या प्रचारावर देखील आयोगाची करडी नजर आहे. समाजमाध्यमांचा गैरवापर करुन खोटी, चुकीची, आक्षेपार्ह माहिती पसरवणाऱ्यांवर देखील आयोग लक्ष ठेवून आहे. जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर विविध टीम यावर लक्ष ठेवून आहेत. जिल्हा स्तरावर आणि राज्यस्तरावर नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून यावर नजर ठेवली जात आहे.
निवडणूक काळात प्रचारासाठी समाजमाध्यमाचा वापर: ऑडिओ आणि व्हिडिओच्या माध्यमातून प्रचार करण्यासाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. अनेक उमेदवार, राजकीय पक्ष विविध समाजमाध्यमांचा वापर करुन त्यांच्या कार्यक्रमाबाबत, उपक्रमाबाबत माहिती देतात. युट्यूब, एक्स, व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम, दूरध्वनी कॉल, एसएमएस, प्रचारासाठी बनवलेले विशेष ऍप अशा विविध समाजमाध्यमाचा निवडणूक काळात प्रचारासाठी वापर केला जातो. याशिवाय टीव्ही, रेडिओ, केबल, वेबसाईट अशा ठिकाणी प्रसारित केल्या जाणाऱ्या जाहिरातीसाठी देखील पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. आक्षेपार्ह पोस्ट केल्यास त्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात येईल, असे आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. उमेदवार आणि पक्षांना विविध परवानग्या ऑनलाईन पध्दतीने मिळवण्यासाठी ऍप देखल उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
वस्तुसाठी विशिष्ट दर :उमेदवाराची खर्च मर्यादा ४० लाख रुपये, निवडणूक आयोगाकडून प्रत्येक बाबीसाठी दरपत्रक विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला 40 लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याची परवानगी निवडणूक आयोगाने दिली आहे. उमेदवाराला खर्चाचे विवरण आयोगाला सादर करायचे आहे. मर्यादेपेक्षा जास्त खर्च झाल्यास त्याविरोधात कारवाई केली जाईल. उमेदवारांना खर्चासाठी प्रत्येक वस्तुसाठी विशिष्ट दर देण्यात आला आहे. दरपत्रकात चहा, नाष्टापासून जाहिराती, पोस्टर, वाहनाचा खर्च, पुष्पगुच्छांचा दर ठरवण्यात आला आहे. चहासाठी १० रुपये, कॉफी १२ रुपये, पोहे-मिसळपाव, ऑम्लेट २५ रुपये, वडापाव १५ रुपये, शाकाहारी जेवण थाळी ११० रुपये, मांसाहारी जेवण थाळी १४० रुपये, पुलाव ७५ रुपये, पुरीभाजी ६० रुपये, कोल्ड्रिंक्स छोटी बाटली १० रुपये आणि मोठी बाटली ४० रुपये, पावभाजी ७० रुपये, नाष्टा ३८ रुपये असा दर ठरवून देण्यात आला आहे.
...नाही तर उमेदवाराविरोधात कारवाई होणार : याशिवाय पुष्पगुच्छांसाठी १७५ रुपयांपासून १ हजार रुपये, पुष्पहारासाठी ५० रुपयांपासून २ हजार रुपये, खासगी वाहनासाठी प्रति दिन ५ हजार रुपये आणि रेंजरोव्हर सारख्या वाहनांसाठी प्रतिदिन २२ हजार रुपये खर्च ठरवण्यात आला आहे. दुचाकीसाठी पेट्रोल खर्चासहित दिवसभरासाठी ७०० रुपये दर देण्यात आला आहे. ढोल-ताशा पथकातील प्रत्येक माणसाला १ हजार रुपये, सुतळी बॉम्बसाठी ५० रुपये, १०० फटाक्यांची माळेसाठी ५०० रुपये, आकाशातील आतषबाजी प्रति नग १५०० रुपये, विनावातानुकुलित हॉटेल रुम १६५० रुपये, वातानुकुलित रुम ३ हजार रुपये असे दर ठरवण्यात आले आहेत. यापेक्षा जास्त खर्च केला तर उमेदवाराविरोधात कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा -
- पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघाचं चित्र स्पष्ट; महायुती महाविकास आघाडीत होणार समोरासमोर लढत
- मशालीचा प्रकाश महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचणार, माहीमचे उबाठाचे उमेदवार महेश सावंत यांना विश्वास
- महायुतीला दणका; रिपब्लिकन पक्षाच्या 50हून अधिक पदाधिकाऱ्यांनी घेतली शपथ