महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

"...तर लाडकी बहीण योजनेचे पैसे दुप्पट होणार", मुख्यमंत्री शिंदेंचं लाडक्या बहिणींना आश्वासन - Ladki Bahin Yojana - LADKI BAHIN YOJANA

Eknath Shinde On Ladki Bahin Yojana : 'राज्यात जोपर्यंत महायुती, तोपर्यंत तुमच्या संसाराला मिळेल गती', असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना दिला. ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यात बोलत होते. तसंच यापुढं 17 ऑगस्ट हा 'मुख्यमंत्री लाडकी बहीण दिन' म्हणून साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

CM Eknath Shinde criticized opposition party over Ladki Bahin Yojana in Satara
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 18, 2024, 6:07 PM IST

सातारा Eknath Shinde On Ladki Bahin Yojana : "योजना फसवी आहे. चुनावी जुमला आहे. पैसे येणारच नाहीत., अशी टीका करत सावत्र भावांनी ही योजना बंद पाडण्याचे प्रयत्न केले. मात्र, लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे मेसेज पाहून विरोधकांच्या छातीत धडकी भरली. त्यांची थोबाडं पांढरी फटक झाली,"असा सणसणीत टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावलाय. "या योजनेमुळं वेडे झालेल्या विरोधकांना सातारी कंदी पेढे पाठवा," असं मिश्किल आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.

आपली बहीण लाडकी, विरोधकांच्या छातीत धडकी : साताऱ्यातील लाडकी बहीण सन्मान सोहळ्यात शिंदे-फडणवीसांनी जोरदार फटकेबाजी करत विरोधकांचा समाचार घेतला. 'आपली बहीण लाडकी, विरोधकांच्या छातीत भरली धडकी', असं म्हणत महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम सुपरडुपर हिट झाला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तीन दिवसात 1 कोटी महिलांना 3 हजार कोटींचं वाटप झालंय. आपल्यासाठी पूर्ण आर्थिक वर्षामध्ये 35 हजार कोटींची तरतूद ठेवलेली असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

बहिणींनी ताकद दिल्यास दीड हजाराचे तीन हजारही होतील : मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "दीड हजार रुपयानं ही योजना सुरू केलीय. पुढं सरकारची ताकद वाढली तर दीड हजाराचे तीन हजारही होतील. त्यापेक्षाही जास्त देण्याची आमची दानत आहे. आपण जेवढी ताकद द्याल, तेवढ्या ताकदीनं तुमच्या खात्यात पैसे टाकण्याचं काम केल्याशिवाय राहणार नाही. दीड हजार रुपये देवून आम्हाला थांबायचं नाही", असं मुख्यमंत्री शिंदें यांनी लाभार्थ्यांना संबोधित करताना सांगितलं.

तुम्ही टेन्शन घेऊ नका, सावत्र भावांना टेन्शन द्या :कपटी भावांपासून सावध राहण्याचा सल्ला देतानाच 'तुम्ही टेन्शन घेवू नका, सावत्र भावांना टेन्शन द्या', असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. " ही योजना बंद होणारी नाही. त्याची पूर्ण तरतूद केलेली आहे. आर्थिक परिस्थिती बदलत जाईल, तसतसं सरकार आपल्यासाठी आणखी योजना आणेल. इथं देना बँक आहे, लेना बँक नाही. लाडक्या बहिणींसाठी हा माहेरचा आहेर आहे. हे सरकार बहिणींचे माहेरघर आहे. दर महिन्याला ही ओवाळणी मिळणार आहे," असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

तुमच्या खात्यात पैसे आले का? फॉर्म भरताना त्रास झाला का, कोणी पैसे मागितले का? ही योजना तुमच्यासाठी आहे. कुणालाही एक रुपया द्यायचा नाही. आता तुम्हाला कोणाकडे पैसे मागायची वेळ येणार नाही. हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है-मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे

ज्याच्या मागे ताई, त्याला कोणी थांबवू शकत नाही : "मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळं आपल्या मागे लाडक्या बहिणींची कवचकुंडलं तयार झाली आहेत. 'जाको राखे साईया, मार सके ना कोई. ज्याच्या मागे ताई, त्याला कोणी थांबवू शकत नाही", असा सूचक इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीला दिला. तसंच या योजनेपासून आम्ही कोणालाही वंचित ठेवणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

बहिणींच्या आशिर्वादाने महायुतीच सत्तेवर येईल : "इलेक्शनपुरती ही योजना असल्याचे सांगणाऱ्या सावत्र भावांना आम्ही बजेटच दाखवलं. उद्या जर हे सावत्र भाऊ सत्तेत आले तर लाडक्या बहिणींचं अनुदान थांबवतील. परंतु, काळजीचं कारण नाही. लाडक्या बहिणींच्या आशिर्वादानं पुन्हा महायुतीच सत्तेवर येईल. ही योजना सुरू राहील", असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

हेही वाचा -

  1. सातारा, कराडात पावसाची दमदार हजेरी, भात पिकांना मिळाली संजीवनी, मुख्यमंत्र्यांची होर्डींग मात्र पडली, पाहा व्हिडिओ - Satara Rain News
  2. लाडकी बहीण योजनेत खोडा घालणाऱ्यांना जोड्यानं मारा - मुख्यमंत्री - Majhi Ladki Bahin Yojana
  3. लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम आली; तरीही बँकांसमोर महिलांची गर्दी... काय आहे कारण? - Ladki Bahin Yojana

ABOUT THE AUTHOR

...view details