कोल्हापूर : लवकरच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. दोनच दिवसांपूर्वी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी कोल्हापूरचा झंझावाती दौरा केला. या दौऱ्यात विचारधारेची आखणी करताना छत्रपती शिवरायांपासून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान हा साचा घट्ट करत पश्चिम महाराष्ट्रात इंडिया आघाडीसह महाविकास आघाडीला बळ देण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसरीकडं महायुतीतील धुसफूस आता पुढे येत आहे. "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात वाढलेल्या ताकदीमुळं कोल्हापूर उत्तर विधानसभा जिंकूच. मात्र, दक्षिणचा आमदार ही शिवसेनाच ठरवणार," असा निर्धार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केलाय.
कोल्हापूर उत्तर मधून लढण्यास भाजपाही इच्छुक : कोल्हापुरात बहुतांश शहरी भाग असलेला कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसनं या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर विधानसभा मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटानं आपला हक्क सांगत राजेश क्षीरसागर यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. परंतु, याच जागेवरुन भाजपा आणि शिवसेनेत जोरदार वाद सुरू झालाय. भाजपाकडून खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक, पोटनिवडणुकीचे उमेदवार सत्यजित कदम, भाजपाशी एकनिष्ठ असलेले राहुल चिकोडे उत्तर मधून इच्छुक आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी राजेश क्षीरसागर माध्यमांशी बोलताना खासदार महाडिक यांनी आपल्या मुलाला समजावून सांगावं, असं म्हणाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा ते ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय.
उत्तरमध्ये डोकवाल तर आम्ही दक्षिणेत येऊ : राजेश क्षीरसागर यांनी रविवारी (6 ऑक्टोबर) कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात मेळावा घेतला. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. येथून धनंजय महाडिक यांचे बंधू अमल महाडिक निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. यामुळं क्षीरसागर यांनी दक्षिणेत मेळावा घेत एक प्रकारे आपली ताकद तर दाखवून देण्याचा प्रयत्न केला. तसंच या मेळाव्याच्या माध्यमातून "तुम्ही उत्तरमध्ये डोकवाल तर आम्ही दक्षिणेत तुमच्यामध्ये येऊ" असा इशाराही क्षीरसागर यांनी दिला.