मुंबई :राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दारुण पराभव स्वीकारावा लागल्यानं मविआतील घटकपक्षांमध्ये दुरावा वाढीस लागल्याची चिन्हे दिसत आहेत. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात मविआतील घटक पक्षांमधील स्वतंत्र कारभार समोर आला. त्यामुळं ही आघाडी आता फुटीकडं मार्गक्रमण करत असल्याची चर्चा सुरु झाल्याची माहिती, राजकीय विश्लेषक जयंत माईनकर यांनी दिली.
समाजवादी पक्षाच्या दोन्ही आमदारांनी शपथ घेतली : अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मविआतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना (उबाठा) या पक्षांच्या विजयी उमेदवारांनी आमदारकीची शपथ घेऊ नये असा निर्णय घेतला होता. मात्र, मविआचा घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाच्या दोन्ही आमदारांनी त्यांना न जुमानता पहिल्याच दिवशी आमदारकीची शपथ घेतली. उध्दव ठाकरेंचे निकटवर्तीय आमदार मिलींद नार्वेकर यांनी वादग्रस्त पोस्ट केल्याबद्दल समाजवादी पक्षाने जाब विचारत शिवसेनेने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांना उत्तर देण्याऐवजी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी थेट समाजवादी पक्ष भाजपाची बी टीम असल्याचा आरोप केला.
पक्षांमध्ये सुसंवाद आणि समन्वयाचा अभाव : दुसरीकडं, मविआने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीत सहकार्य करत बिनविरोध अध्यक्षपदासाठी पाठिंबा दिला असताना आदित्य ठाकरे यांनी मात्र शिवसेना उबाठा पक्षाचा या निवडप्रक्रियेवर आणि मंत्री परिचयावर बहिष्कार असल्याचं स्पष्ट केलं. मात्र, विधानभवनाच्या प्रांगणात आदित्य ठाकरे हे बहिष्काराची माहिती माध्यमांना देत असताना विधानसभेच्या सभागृहात मात्र कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शप पक्षाचे आमदार मात्र विधानसभा अध्यक्षांच्या कामाचे गोडवे गात होते. त्यामुळं मविआतील प्रमुख पक्षांमध्ये सुसंवाद आणि समन्वयाचा अभाव असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी आमदारकीची शपथ घेतल्यानंतर आपल्याला शपथ न घेण्याबाबत मविआकडून काहीही माहिती मिळाली नसल्याचं स्पष्ट केलं होतं असल्याचं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे.