नवी दिल्ली- इंडिया आघाडीमधील नेतृत्वाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झालीय. ममता बॅनर्जी यांच्याकडे इंडिया आघाडीचे नेतृत्व द्यावे, असे लालू यादव यांनी म्हटलंय. त्यावर आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत मोठे वक्तव्य करण्यात आलंय. राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित करत नसल्याचं त्यांनी अधोरेखित केलंय. राहुल गांधी आमचे नेते आहेत. आमच्या मित्र पक्षांची मतं वेगवेगळी असू शकतात, पण आम्ही सगळ्यांनी मिळून इंडिया आघाडीची स्थापना केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातील वातावरणात राहुल गांधींचे महत्त्वाचे योगदान आहे. इंडिया आघाडीत फक्त काँग्रेसचा समावेश नाही. समाजवादी पार्टीही आहे, इतर पक्षही आहेत. काँग्रेसनेही सहभागी होऊन चर्चा करावी, असंही संजय राऊत म्हणालेत.
राहुल गांधींशी आमचे सौहार्दपूर्ण संबंध : ममतांबाबतच्या लालू प्रसाद यादव यांच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले की, इंडिया आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे. केवळ काँग्रेस पक्ष नाही, तर इतर पक्षही आहेत. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी आमचे सौहार्दपूर्ण संबंध आहेत. काँग्रेसचे अधिक खासदार निवडून आलेत. जास्तीत जास्त वेळ देणाऱ्या नेतृत्वाबाबत सर्वांनी एकत्र बसून चर्चा करावी. कदाचित नवीन पटनायकही त्यात सामील होऊ शकतात. त्यांच्याशी चर्चा सुरू आहे, असंही संजय राऊत म्हणालेत.
काय म्हणाले लालू प्रसाद यादव? :खरं तर ममता बॅनर्जींकडे इंडिया आघाडीचे नेतृत्व द्यावे, असे लालू प्रसाद यादव म्हणाले होते. काँग्रेसच्या आक्षेपावर ते म्हणालेत की, त्यात काहीही वावगं नाही. आम्ही ममता बॅनर्जींना पाठिंबा देऊ.