मुंबई- जनसामान्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या केसरी टूर्स कंपनीचे संस्थापक अन् अध्यक्ष केसरीभाऊ पाटील यांचे आज पहाटे निधन झालंय. ते केसरी परिवाराचे आधारस्तंभ होते, वयाच्या 50 वर्षी त्यांनी केसरी टूर्सची स्थापना केली असून, खूप कष्टाने जग विख्यात कंपनी म्हणून केसरीला नावारूपास आणले. त्यांना पर्यटन क्षेत्रातील विद्यापीठ म्हणून संबोधले जायचे. त्यांनी अनेकांना प्रेमाने मार्गदर्शन करून असंख्य हृदये जिंकलीत. शनिवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत वांद्रे येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दादरमधल्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांचावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पुण्यातील एसपी कॉलेजमधून डिप्लोमा प्रशिक्षण : शेतकरी, शिक्षक, टूर गाईड, उद्योजक, करोडपती असा प्रवास केसरीभाऊ पाटील यांनी केलाय. महाराष्ट्रातील सफाळे जवळील एका दुर्गम गावात राहणाऱ्या शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले केसरीभाऊ यांनी 11 वीपर्यंत शिक्षण वसईतून घेतले. 1955 ला शेतीमध्ये डिप्लोमा करण्यासाठी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील कोसबाड येथे ते आले. एका वर्षानंतर 21 वर्षांच्या वयात त्यांना त्याच जिल्ह्यातील बोर्डे हायस्कूलमध्ये कृषी शिक्षकाची पहिली नोकरी मिळाली. कालांतरानं त्यांना कुटुंबाची शेती सांभाळावी लागली. 1957 मध्ये त्यांनी सफाळे येथील विद्याभवन येथे शिक्षकाची नोकरी स्वीकारली. पुण्यातील एसपी कॉलेजमधून डिप्लोमा प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 1967 मध्ये त्यांचा भाऊ राजाभाऊंनी मुंबईत त्यांची ट्रॅव्हल एजन्सी राजा राणी ट्रॅव्हल्स सुरू केली आणि केसरीभाऊ त्यांच्यासोबत भागीदार म्हणून सामील झाले. त्यांना तीन महिन्यांतून एकदा 5 हजार किंवा 10 हजार रुपये मिळत असे, टूर गाईड म्हणून ते जग पाहण्यात यशस्वी झाले. केसरीभाऊंनी 17 वर्षे तिथे काम केले आणि या काळात त्यांचे लग्न झाले अन् त्यांना चार मुले झाली. त्यानंतर त्यांना जाणवले की, स्वतःचा व्यवसाय सुरू करणे हाच पुढे जाण्याचा मार्ग आहे.
केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स हा स्वतःचा उपक्रम : शेवटी 1984 मध्ये त्यांनी भावाची एजन्सी सोडली आणि केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स हा स्वतःचा उपक्रम सुरू केला. त्यांच्याकडे त्यावेळी बचत अन् पैसे नव्हती. त्यावेळी त्यांची पत्नी सुनीता पुढे आल्या आणि त्यांनी केसरीभाऊंना दागिने विकण्यास सांगितले. त्या पैशातून अन् मित्रांकडून घेतलेल्या कर्जासह केसरीभाऊंनी कंपनीसाठी 1.85 लाख रुपये भांडवल जमवून गुंतवणूक केली. त्याकाळी ते मुंबईतील माहीम येथील एका चाळीत 100 चौरस फूट खोलीत राहत होते. मार्च 1984 मध्ये त्यांनी कंपनीची अधिकृतपणे सुरुवात केली आणि त्यांची पहिली जाहिरात केलेली ट्रिप राजस्थानला होती, जिथे जाण्यासाठी 13 प्रवाशांनी नोंदणी केली. दुसऱ्या काश्मीर ट्रिपसाठी 39 प्रवासी आले. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.
केसरीच्या भारत आणि परदेशात 11 शाखा : आज टूर्स अन् टॅव्हल्स क्षेत्रात केसरी एक नावाजलेली कंपनी आहे. केसरी टूर्स कंपनीकडे आता भारत आणि परदेशात 11 शाखा आहेत, तसेच एकूण कर्मचारी संख्या सुमारे 700 आहे. गेल्या काही वर्षांत केसरीनं ब्रँडिंग आणि प्रमोशनपासून ते इन-हाऊस फॉरेन एक्सचेंज सेवांपर्यंतच्या विविध क्षेत्रात विशेषज्ज्ञ असलेल्या 24 उपकंपन्या स्थापन केल्यात. केसरीभाऊंची मुले तो व्यवसाय आता सांभाळत आहेत. केसरीकडे स्ट्रॉबेरी हॉलिडेज आहेत, जे स्वतंत्र सुट्टी एन्जॉय करणाऱ्यांसाठी आहेत.
हेही वाचाः
"...तर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद न घेता साधना करावी", चंद्रकांत पाटील यांचा राऊतांना टोला
महाराष्ट्रात लोकसंख्येपेक्षा मतदार अधिक, राहुल गांधींकडून निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह