मुंबई : विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election) राज्यातील जनतेनं महायुतीला भरघोस मतदान करुन एकहाती सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा करुन दिला. अशात निवडणुकीचा निकाल लागून महायुतीला स्पष्ट बहुमत मिळून 6 दिवस झाले, तरी देखील मुख्यमंत्री पदाचा पेच कायम आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाला सलग तिसऱ्यांदा 100 च्या वर जागा मिळवण्यात यश आलंय. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री केलं जाईल, हे जवळपास निश्चित मानलं जातंय. मात्र, याबाबतची घोषणा अद्याप झालेली नाही.
महायुतीची 'महा'बैठक :महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण असणार? शपथविधी कधी होणार? मंत्रिमंडळ कसं असेल? आदी मुद्द्यांवर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख अजित पवार यांची गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. मात्र, बैठकीनंतरही मुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स कायम आहे.
फडणवीसांनी मानले अमित शाह यांचे आभार :बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करत अमित शाह यांचे आभार मानले. ते म्हणाले, "महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरुन या महत्वाच्या लढाईमध्ये जी साथ अमित शाह यांनी दिली आणि सर्व कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली, प्रेरणा दिली याबद्दल त्यांचे आज नवी दिल्ली येथे मनःपूर्वक आभार मानले. यावेळी भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा जी, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि महायुतीचे वरिष्ठ नेते, सहकारी उपस्थित होते."
एकनाथ शिंदे काय म्हणाले? :अमितशाह आणि जेपी नड्डा यांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले की, "बैठक चांगली आणि सकारात्मक होती. ही पहिलीच बैठक होती. आम्ही अमित शाह आणि जे पी नड्डा यांच्याशी चर्चा केली. महायुतीची आणखी एक बैठक होणार आहे. या बैठकीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय घेतला जाईल." तसंच ही बैठक मुंबईत पार पडणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा -
- महाराष्ट्रात फडणवीस नाही तर कोण? वाचा भाजपाचं धक्कातंत्र आहे तरी काय
- “अजित पवार मुख्यमंत्री झाले तर मी..."; रोहित पवारांचा काकांना टोमणा
- अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवारांच्या पक्षापेक्षा कमी मते मिळूनही जागा जास्त; नेमका गोंधळ काय?