पुणे : विधानसभा निवडणुकीला सुरूवात झाली असून, राज्यासह देशभरातील नेतेमंडळी ठिकठिकाणी सभा घेत आहेत. सत्ताधारी पक्षाचे केंद्रातील वरिष्ठ नेते आणि मंत्री हे राज्यात तळ ठोकून आहेत. तर 'इंडिया' आघाडीचेही ज्येष्ठ नेते हे महाराष्ट्रात जोरदार प्रचार करत सत्ताधाऱयांवर टीका करत आहेत. प्रचारासाठी नेत्यांची मोठी फौज राज्यातील कानाकोपऱयात पोहचत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही राज्यात प्रचार करत आहेत.
पुण्यात जंगी स्वागत :पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील राज्याच्या दौऱ्यावर असून, मोदींच्या सभा राज्यभर होताना पाहायला मिळत आहे. मंगळवारी (12 नोव्हेंबर) पुणे शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होती. या सभेला मोठ्या संख्येनं कर्यकर्ते हजर होते. स.प. महाविद्यालय येथे ही सभा आयोजित करण्यात आली होती. मोदी पुण्यात येताच भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. मोदींचा ताफा सभास्थळी जात असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूनं त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
मोदींची तगडी सुरक्षा यंत्रणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 'व्हीव्हीआयपी' नेते आहेत. त्यामुळं सुरक्षेसाठी त्यांच्याभोवती SPG कमांडोंचा घेरा असतो. त्यामुळं कोणालाही त्यांच्याजवळ जाणं सहज शक्य होत नाही. आता ते प्रचारासाठी महाराष्ट्रात आहेत. मंगळवारी त्यांनी चंद्रपूर, सोलापूर आणि पुणे येथे सभा घेतल्या. सुरक्षेच्या कारणामुळं या सभांना येणाऱया नागरिकांचीही सुरक्षा यंत्रणांकडून कसून तपासणी करण्यात येते. व्हीव्हीआयपी पास असणाऱयांचीही तपासणी करण्यात येते.