पुणे DCM Devendra Fadnvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी बारामतीतील भाजपा कार्यकर्त्यांची अजित पवार यांच्या समक्ष एका मोठ्या हॉटेलमध्ये बैठक घेतली. त्यात मोठे खुलासे केले असून 48 तासांचं फडणवीस पवार सरकार सुद्धा टिकलं असतं. "अजित पवारांनी म्हटलं होतं की, शरद पवारांनी माझ्यासमोर शब्द दिलाय, मी तुमच्या सोबत आहे. परंतु, शरद पवार साहेबांनी ऐनवेळी माघार घेतली आणि दुर्दैवानं कोर्टाचा निकाल आमच्या विरोधात आला नाही तर तुम्हाला तक्रार करायची वेळ आली नसती, तुमचे प्रश्न तेव्हाच सोडवले असते," असा मोठा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. पुण्यातील नगर रोडवरील एका आलिशान हॉटेलमध्ये रात्री उशिरा कार्यकर्त्यांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. विशेष म्हणजे काही निवडक कार्यकर्त्यांची ही बैठक होती, तसंच जवळपास दीड तास ही बैठक चालू होती.
आपण मोदींसाठी एकत्र : "बारामतीमधील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये 25 वर्षे अन्यायाची भावना आहे. निश्चितपणे हा अन्याय झालेला आहे. सत्तेचा गैरवापर झालेला असल्याचं स्पष्ट मत अजित पवारांसोबत देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत मांडलंय. शेवटी दोन विरोधकांत लढाई लढत असताना एका विरोधकांवर अन्याय होत असतो. त्यामुळं गेल्या 25 वर्षात जे काही झालं ते विसरुन मोदींसाठी आपण एकत्र आलेलो आहोत. बारामतीमध्ये अजित पवार शब्दांचे पक्के आहेत. तसंच यापुढं भाजपाच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी माझी आणि अजित पवारांची आहे. जेवढा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला न्याय असेल, तेवढाच सगळ्या सत्तेचा भागीदारीमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्याला न्याय दिला जाईल. त्याचबरोबर जर काही कठीण प्रश्न निर्माण झाले तर मी स्वतः तुम्हाला घेऊन अजित पवारांसोबत बैठक घेऊन हा प्रश्न सोडवेल," असं आश्वासन सुद्धा या ठिकाणी फडणवीसांनी दिलंय. 'ए फॉर अमेठी बी फॉर बारामती' असं आपलं मिशन आहे. यावेळेस आम्ही आता बारामती जिंकू असं सुद्धा देवेंद्र फडणवीस या बैठकीत म्हणाले.