महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

सरकार आल्यास महिलांना राज्यात मोफत प्रवास, लाडक्या भावांनाही भरघोस मदत, राहुल गांधींसह शरद पवार, उद्धव ठाकरेंची ग्वाही

वांद्रे कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानात महाविकास आघाडीची ‘महाराष्ट्र स्वाभिमान' सभा होत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावेळी अनेक घोषणा केल्या.

Maha Vikas Aghadi
महाविकास आघाडी (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : 4 hours ago

Updated : 1 hours ago

मुंबई: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत वांद्रे कुर्ला संकुलात मविआची ‘महाराष्ट्र स्वाभिमान सभा' पार पडत आहे. या सभेच्या माध्यमातून मुंबईतून मविआच्या प्रचाराचा नारळ फुटला आहे. काँग्रेसर्फे या सभेत विविध गॅरंटी जाहीर करण्यात आल्या. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यास सर्वच महिलांना राज्यभर मोफत प्रवासाची राहुल गांधींनी घोषणा केली.

सभेत बोलताना राहुल गांधी (ETV Bharat Reporter)

राहुल गांधी यांनी दिली गँरटी :धारावीची एक लाख कोटी रुपये किंमतीची गरीबांची जमीन तुमच्या डोळ्यांसमोर एका अब्जाधीशाला देण्यासाठी हिसकावून घेतली जात आहे. एकीकडं अब्जाधीशांचे सरकार आहे तर दुसरीकडं सर्वसामान्यांचे सरकार आहे. आम्ही पाच गँरटी देत आहोत, त्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आम्ही कार्यरत राहू अशी ग्वाही लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिली.

सभेत बोलताना शरद पवार आणि उध्दव ठाकरे (ETV Bharat)

महाविकास आघाडीच्या ५ गॅरंटी

1- महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला ३००० रुपये तसेच महिला आणि मुलींना मोफत बस प्रवास

2- शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ तसेच नियमित कर्जफेडीसाठी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन

3- जातनिहाय जनगणना करणार, ५० टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील

4- २५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा आणि मोफत औषध

5- बेरोजगार तरुणांना दर महिन्याला ४००० रुपयांपर्यंत मदत

महागाई वाढली: ही विचारधारेची लढाई आहे. एकीकडं आंबेडकरांचे संविधान, प्रेम, एकता, समानता आहे तर दुसरीकडं भाजपा आरएसएसचा मागून संविधान हटवण्याचा प्रयत्न सुरु आहे. हे काम खुलेपणानं केलं तर पूर्ण देश त्यांच्या विरोधात उभा ठाकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अनेक मोठे प्रकल्प राज्यातून बाहेर गेले, तुमची जमीन, तुमचे प्रकल्प हिसकावून घेतले जात आहेत. महागाई वाढली, पेट्रोल दरात वाढ करुन प्रत्येक कुटुंबाच्या खिशातून 90 हजार काढून अदानी अंबानीच्या खिशात घालतात. नंतर महिलांना 1500 रुपये देतात, असे राहुल गांधी म्हणाले.

महालक्ष्मी योजना : महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला ३००० रुपये तसेच महिला आणि मुलींना मोफत बस प्रवास करता येईल. तसेच जातनिहाय जनगणना करणार आणि ५० टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

जातीनिहाय जनगणना : न्यायालये, प्रसारमाध्यमे, कॉर्पोरेटमध्ये अल्पसंख्याक, दलित, मागासवर्ग दिसत नाहीत. त्यामुळं जातीनिहाय जनगणना आवश्यक आहे. देशाच्या पॉवर सेक्टरमध्ये यांचे प्रतिनिधित्व दिसत नाही. कर्नाटक, तेलंगणामध्ये जातीनिहाय जनगणना करण्याचं काम सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.

संविधानामुळं संरक्षण : संविधान रद्द झाले तर गरीब, मागास वर्गाला काही मिळणार नाही, तुमच्या अधिकारांचं संरक्षण संविधानामुळं होतं. संविधान केवळ एक पुस्तक नाही, यामध्ये महापुरुषांचे विचार आहेत त्यामध्ये गरीबांचा आवाज आहे. यावेळी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे प्रमुख नेते उपस्थित होते.

बेरोजगार तरुणांना मदत :शिवसेना उबाठा प्रमुख उध्दव ठाकरे यांनी बेरोजगार तरुणांना दर महिन्याला ४००० रुपयांपर्यंत मदत केली जाईल ही गँरंटी जाहीर केली. आपल्याला 23 ला विजयाचे फटाके फोडायचे आहेत. महागाईमुळं अनेक घरातील फराळ गायब झाला. योजनांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आनंदाच्या शिधामध्ये उंदराच्या लेंड्या मिळतात याकडं त्यांनी लक्ष वेधलं. आमच्या सरकारच्या काळात पूर्वीप्रमाणे पाच जीवनावश्यक वस्तूंचे दर शेतकऱ्यांचं नुकसान न होऊ देता स्थिर दर ठेवणार, अशी ग्वाही त्यांनी दिली.

आरोग्य विमा आणि मोफत औषध : कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी २५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा आणि मोफत औषध देण्याची गँरंटी जाहीर केली. पाच गँरटी सर्वांच्या हिताच्या आहेत. आम्ही काँग्रेसशासित राज्यांमध्ये गँरंटी पूर्ण केल्या. मात्र आमच्यावर टीका करणाऱ्या मोदींना त्यांनी तुम्ही कुठली गँरंटी पूर्ण केली असा सवाल विचारला. त्यांनी 2 कोटी तरुणांना रोजगार देणार, एमएसपी डबल करणार, नोटबंदीचा सामान्यांना लाभ होईल, अशा अनेक गँरंटी दिल्या, मात्र एकही गँरंटी मोदींनी पूर्ण केली नाही. मोदी खोट्यांचे शिरोमणी आहेत अशी टीका त्यांनी केली.

मविआचे दिग्गज नेते उपस्थित: कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, निरीक्षक खासदार सय्यद नासीर हुसेन, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कॉंग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड, कॉंग्रेसच्या प्रचार समितीचे अध्यक्ष खासदार चंद्रकांत हंडोरे, महिला कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा, आमदार अमीन पटेल, आमदार अस्लम शेख, शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत, शिवसेना नेते सुभाष देसाई, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत, समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.अबू आसिम आझमी, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.अबू आसिम आझमी, प्रकाश रेड्डी, रिपब्लिकन पक्षाचे डॉ. राजेंद्र गवई, आम आदमी पक्षाचे रुबेन मर्कहान्सेस हे देखील या सभेसाठी व्यायपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नाना पटोले आणि सचिन सावंत यांनी केलं. वांद्रे कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानात ही स्वाभिमान सभा पार पडली.

हेही वाचा -

  1. "काँग्रेसनं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला", योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
  2. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे घोषणापत्र प्रसिद्ध, 'लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवणार;' अजित पवारांचं आश्वासन
  3. "20 तारखेला बकरीला कापू," सुनील राऊतांचं वादग्रस्त विधान; आक्षेपार्ह विधानांमुळे विरोधक वारंवार अडचणीत, नेमकी कारणं काय?
Last Updated : 1 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details