बेंगळुरु Congress MP DK Suresh : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री यांचे भाऊ तथा काँग्रेस खासदार डी. के. सुरेश यांनी अर्थसंकल्पानंतर एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. त्यांनी दक्षिण भारताचा निधी उत्तर भारतासाठी वळविला जात असल्याचा गंभीर आरोप करत यामुळं दक्षिण भारतासाठी वेगळ्या देशाची मागणी करावी लागेल, असं वक्तव्य केलंय. त्यांच्या या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता असून भाजपानं सुरेश यांच्यावर टीका केलीय.
काय म्हणाले खासदार सुरेश : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावर प्रतिक्रिया देताना डी. के. सुरेश यांनी हे वक्तव्य केलंय. ते म्हणाले, "केंद्रानं आम्हाला जे पैसे देणं बाकी आहेत. ते जरी आम्हाला दिले तर ते पुरेसं होईल. जीएसटी म्हणून जमा केलेला कर, सीमाशुल्क आणि प्रत्यक्ष कर आमच्यापर्यंत पोहोचायला हवेत. दक्षिण भारतासोबत खूप चुकीचं घडतेय, हे आम्ही पाहत आहोत. विकासाच्या निधीतील आमचा वाटा उत्तर भारतात वळवला जातोय. सर्व बाबतीत आमच्याशी चुकीची वागणूक आहे", असा आरोप सुरेश यांनी केलाय.
तर दक्षिण भारताला वेगळा देश बनविण्याची मागणी करावी लागेल : पुढं बोलताना खासदार डी. के. सुरेश म्हणाले, "आपण जर याचा विरोध केला नाही, तर दक्षिण भारताला वेगळा देश बनविण्याची मागणी करावी लागेल." तसंच हिंदी राज्यं ती करण्यासाठी आम्हाला भाग पाडत आहेत, असंही सुरेश म्हणाले. यावर कर्नाटकचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी अशाच भावनांमुळं फाळणी झाल्याची टीका केलीय.
डी के शिवकुमार काय म्हणाले : आपल्या भावानं केलेल्या वक्तव्यावर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार म्हणाले, "डी. के. सुरेश किंवा इतर कोणत्याही नेत्यानं दक्षिण भारताच्या वेदना बोलून दाखवल्या आहेत. अर्थसंकल्पात समतोल असायला हवा. संपूर्ण देश एक आहे. या अर्थसंकल्पात अर्थव्यवस्थेचं समान वाटप केलेलं नाही. कर्नाटक केंद्राला भरपूर महसूल देतं. मात्र संपूर्ण दक्षिण भारतासाठी कोणतीही मोठी घोषणा या अर्थसंकल्पात केलेली नाही," असा आरोप डी. के. शिवकुमार यांनी केलाय. तसंच केंद्रानं आम्हाला निराश केलंय. पण संपूर्ण देश एक आहे. आम्ही भारतीय आहोत. भारतानं एकसंध असलं पाहिजे, असंही डी के शिवकुमार म्हणाले.
हेही वाचा :
- रोटी, कपडा आणि मकान देणारा अर्थसंकल्प, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
- केंद्रीय अर्थसंकल्पावरून राज्यात विरोधकांची मोदी सरकारवर जोरदार टीका, सत्ताधाऱ्यांकडून अर्थसंकल्पाचं कौतुक
- 'चार जातीं'वर लक्ष केंद्रीत करण्याची गरज; निर्मला सीतारामन यांनी स्पष्टच घेतली 'या' 'चार जातीं'ची नावं