शिर्डी :राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सभा सुरू आहेत. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव प्रियंका गांधी आज (16 नोव्हेंबर) राज्यातील अहिल्यानगर आणि कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांनी शिर्डीत जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना प्रियंका गांधी यांनी महायुती तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
सत्ताधाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला :जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, शिर्डीवाले साईबाबा की जय अशा घोषात प्रियंका गांधींनी भाषणाला सुरवात केली. "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला, त्यातही मोठा भ्रष्टाचार करण्यात आला," असा आरोप प्रियंका गांधी यांनी सरकारवर केलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आव्हानाला प्रत्युत्तर :मुंबईतील एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, "उद्धव ठाकरे तुमच्यात हिंमत असेल, तर राहुल गांधींकडून सावरकर आणि बाळासाहेबांबद्दल दोन चांगले शब्द बोलायला लावा." त्यांच्या या आव्हानाला प्रियंका गांधींनी प्रत्युत्तर दिलं. "बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसची विचारधारा वेगळी होती, पण आजपर्यंत आम्ही कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला नाही," असं प्रियंका गांधी म्हणाल्या.