आमदार अपात्रतेच्या निकालावर जितेंद्र आव्हाड आणि अनिल पाटील यांची प्रतिक्रिया मुंबई Jitendra Awhad On Rahul Narvekar : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्र प्रकरणी आज (15 फेब्रुवारी) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महत्त्वपूर्ण निकाल दिला. यावेळी त्यांनी अजित पवार आणि शरद पवार गटातील कोणत्याच आमदारांना अपात्र ठरविलं नाही. दोन्हीकडील आमदार पात्र असल्याचा निर्वाळा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावेळी दिला. या निर्णयावर आता शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सडकून टीका केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आमदार आणि मंत्री अनिल पाटील यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
नार्वेकरांनी वाचनात काय म्हटलं? : राष्ट्रवादी आमदार अपात्र या प्रकरणाच्या निकालाचं वाचन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सायंकाळी पाच वाजल्यापासून सुरू केलं होतं. निकालाच्या वाचनात त्यांनी विविध मुद्द्यांची माहिती दिली. विधिमंडळातील संख्याबळ हाच मुद्दा ग्राह्य धरणार, राजकीय पक्ष हा व्हीप आणि नेत्यांची निवड करतो, अजित पवार गटाकडे 53 पैकी 41 आमदारांचे पाठबळ असल्यामुळं बहुमताचाही आकडा अजित पवार गटाकडेच आहे, असं राहुल नार्वेकर म्हणाले. तसंच पक्षाची संघटनात्मक आणि नेतृत्वाची बांधणी ही पुरेशी नाही, आणि शरद पवारांच्या मनाविरुद्ध कृती करणं म्हणजे पक्ष सोडणं नसल्याचं देखील राहुल नार्वेकर म्हणाले.
कायद्याची पायमल्ली केली : निकालानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांना सामोरं जाताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, "विधानसभा अध्यक्षांनी निकाल देताना लोकशाही, संविधानाचं कुठही पालन केलं नाही. त्यामुळं त्यांनी कायदा पायदळी तुडवला. तसंच निकाल वाचनात सूची 10 चा आणि व्हीपचा कुठेच उल्लेख करण्यात आला नाही. त्यामुळं विधानसभा अध्यक्ष यांनी हा निकाल एकतर्फी दिला आहे", असं आव्हाड म्हणाले.
...त्यामुळे त्यांची जळजळ होते : दुसरीकडं या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री अनिल पाटील यांनी या निकालाचं स्वागत केलंय. तसंच विरोधक या निकालावर जी टीका करताय ते अत्यंत चुकीचं असून त्यांच्यातली जळजळ ते बाहेर काढत असल्याचंही अनिल पाटील म्हणाले. तसंच 2024 निवडणुकीपर्यंत ते अशीच जळजळ बाहेर काढत राहणार. विधानसभा अध्यक्षांनी बहुमताचा विचार करून आणि कायद्याच्या चौकटीत राहून निकाल दिला आहे. त्यामुळं विरोधकांच्या विरोधात निकाल गेल्यामुळं त्यांचा जळफाट होतोय, असा टोलाही अनिल पाटील यांनी शरद पवार गटाला लगावला.
हेही वाचा :
- अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी पक्ष - राहुल नार्वेकर
- आज जर निर्णय चुकला तर सुप्रीम कोर्टात जाता येईल; शेवटी जनता निर्णय घेईलच - उल्हास बापट
- शरद पवारांच्या मनाविरुद्ध कृती करणं म्हणजे पक्ष सोडणं नाही- विधानसभा अध्यक्ष