नंदुरबार :विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलाय. त्यामुळं सभांचा धडाका पाहायला मिळत आहे. राज्यातील पहिल्या नंबरच्या अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार आमशा पाडवी यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी धडगाव येथे संबोधित केलं. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांनाही धारेवर धरलं.
धडगावला तालुक्याचा दर्जा देणार : "आमशा पाडवी कायम तुमच्यासोबत खंबीरपणे उभे राहतील, याची खात्री देतो. त्यांच्या प्रयत्नातून देहली प्रकल्पाला निधी मंजूर झाला. 422 कोटी 84 लाख रुपयांचा निधी आपण मंजूर केला. येथील स्थानिकांचं स्थलांतर होऊ द्यायचं नाही, त्यासाठी शासन पॅकेज द्यायला तयार आहे. येथील नागरिकांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी आचारसंहिता संपताच दोन रुग्णवाहिका देण्यात येणार. तसंच धडगावला तालुक्याचा दर्जाही दिला जाईल," असे आश्वासनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना दिलेत.
बंडखोरांना हद्दपार करा : माजी खासदार हिना गावित बंडखोरी करत विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या. त्या अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. अक्कलकुवा मतदारसंघ महायुतीत शिवसेनेच्या वाट्याला आला. त्यामुळं या मतदारसंघात शिवसेनेच्या आमशा पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली. प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंडखोरी केलेल्या हिना गावित यांना नाव न घेता सूनावलं. "राज्यात महायुतीचेच सरकार येणार, त्यामुळं ज्यांनी बंडखोरी केली त्यांना आम्ही हद्दपार करणार. आमच्यासोबत मलाई खायची आणि आमच्याच विरोधात बंडखोरी करायची, हे चालणार नाही. बंडखोरांना हद्दपार करा," असा टोला एकनाथ शिंदे यांनी हिना गावित यांचं नाव न घेता लगावला.