कोल्हापूर Chhatrapati Sambhajiraje Birthday :आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. स्वराज्य पक्ष संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे महाविकास आघाडीमधून लोकसभा लढण्यास इच्छुक आहेत. या संदर्भात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांची चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना राज्यसभेवर पाठवण्यासंदर्भात केलेल्या एक्स मीडियातील पोस्टनंतर गेल्या नऊ दिवसांपासून संभाजीराजे छत्रपती माध्यमांपासून दूर होते. मात्र, आज (11 फेब्रुवारी) वाढदिवसाचं औचित्य साधत ते समोर आले आहेत. संभाजीराजे यांनी आज वाढदिवसानिमित्त श्री करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. तसंच ते कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत शुभेच्छा स्वीकारल्या आहेत. राज्यभरातून स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते आज मोठ्या प्रमाणात कोल्हापुरात दाखल झाले आहेत.
नॉट रिचेबल संदर्भात बोलणं टाळलं :कार्यकर्त्यांकडून संभाजीराजे छत्रपती यांचे भवानी मंडप येथे जंगी स्वागत करण्यात आलं. यानंतर त्यांनी श्री करवीर निवासिनी अंबाबाई यांचे दर्शन घेत पूजा केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "वाढदिवसानिमित्त अंबाबाईकडे काहीही वेगळं मागितलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांचा वंशज या नात्यानं लोकांची सेवा करणं हेच मागितलं आहे." पुढं लोकसभेसंदर्भात विचारण्यात आलं असता, आज चांगला दिवस आहे. चांगल्या दिवशी चांगल्या गोष्टी बोलल्या पाहिजेत. तर गेल्या नऊ दिवसांपासून नॉट रिचेबल असण्यासंदर्भात विचारण्यात आलं असता त्यावरदेखील त्यांनी बोलणं टाळलं.