मुंबई - अभिनेता सैफ अली खानच्या घरी चोरीच्या उद्देशानं घुसलेल्या एका घुसखोरानं हल्ला केल्यामुळं बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली होती. त्याच्या अपार्टमेंटमध्ये चोर शिरतो, त्याच्या घराचा दरवाजा उघडून तो त्याच्या मुलाच्या खोलीपर्यंत पोहोचतो, मग त्याच्या घरी काम करणाऱ्या महिलेला जाग येते आणि तिच्या आवाजानं सैफ अली जागा होता आणि त्याच्यावरच तो चोर चाकून हल्ला करुन पळून जातो. साधारण सैफवर झालेल्या हल्ल्याचं वर्णन काहीसं असंच आहे. त्याच्या घरात जातानाच्या सुरक्षेवर अनेक प्रश्न चिन्हा यानिमित्तानं निर्माण झाले. आता त्याच्या घरी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं काम सुरू झालं आहे.
सैफ अली खानच्या वांद्रे येथील घराच्या बाहेर उभे असलेल्या न्यूज एजन्सींच्या कॅमेऱ्यामध्ये बाल्कनीत दोन पुरुष सीसीटीव्ही कॅमेरे बसवताना दिसत आहेत. क्लिपमध्ये, कॅमेरा बसवण्यासाठी एक माणूस एअर कंडिशनरच्या कंडेन्सरवर चढून छतावर पोहोचताना दिसत आहे. सैफच्या सुरक्षेबाबत त्याचे कुटुंबीय चौकस झाल्याचं यावरुन दिसत आहे.
सैफ अली खान चाकूहल्ल्याच्या प्रकरणातील आरोपीला १९ फेब्रुवारी रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. मंगळवारी सकाळी, पोलीस अधिकाऱ्यांनी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद नावाच्या या आरोपीसह, गुन्ह्याचे दृश्य पुन्हा तयार करण्यासाठी अनेक ठिकाणी भेट दिली. आरोपीला प्रथम हल्ला झालेल्या सैफ अली खानच्या वांद्रे येथील निवासस्थानी नेण्यात आलं, त्यानंतर पोलिस पथक नॅशनल कॉलेज बस स्टॉपवर गेले आणि नंतर रेल्वे स्टेशनवरून पोलिस जीपनं निघून वांद्रे पोलीस स्टेशनला परतले.
गेल्या आठवड्यात घुसखोराने चोरीच्या उद्देशाने सैफ अलीच्या घरात प्रवेश केला तेव्हा हा हल्ला झाला. घुसखोर आणि घरकाम करणाऱ्या मोलकरणीमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान, सैफने हस्तक्षेप केला आणि त्याच्या छातीच्या मणक्याला चाकूने वार केले. पोलिसांच्या निवेदनानुसार, गुन्ह्याच्या तपासासाठी विविध तपास पथकं तयार करण्यात आली आहेत आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या कलम ३११, ३१२, ३३१(४), ३३१(६) आणि ३३१(७) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी उघड केलं की आरोपीला ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट येथे ताब्यात घेण्यात आलं तेव्हा तो त्याच्या मूळ गावी पळून जाण्याचा विचार करत होता. पुढं असेंही उघड झालं की आरोपी बांगलादेशातील झलोकाटी जिल्ह्यातील रहिवासी आहे. रविवारी वांद्रे हॉलिडे कोर्टानं आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
५६ वर्षीय स्टाफ नर्स अलेयम्मा फिलिप यांनी या प्रकरणाची तक्रार केली आहे. १६ जानेवारी रोजी पहाटे २:०० वाजताच्या सुमारास ही घटना घडली, ज्यामध्ये सैफ अली खानला गंभीर दुखापत झाली होती. यामध्ये त्याच्या छातीच्या मणक्याला चाकू मारण्यात आला होता. आज लीलावती रुग्णालयातून सैफला डिस्चार्ज मिळाला आहे.