चंदीगड Chandigarh Mayor Election : चंदीगड महापौर निवडणुकीत भारतीय जनता पक्षावर हेराफेरीचा आरोप करत आम आदमी पक्ष आणि काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय. भाजपानं फसवणूक करुन निवडणूक जिंकल्याचा आरोप दोन्ही पक्षांनी केला होता. या प्रकरणावर आज पुन्हा सुनावणी होणार आहे. मात्र सुनावणीपूर्वी मोठा राजकीय उलटफेर झालाय. चंदीगडचे नवनियुक्त महापौर मनोज सोनकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. तसंच 'आप'च्या तीन नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केलाय. यामुळं चंदीगड महापौर निवडणुकीचा संपूर्ण खेळच बदललाय. (Chandigarh Mayor Election)
चंदीगड महापालिकेची स्थिती काय : आपच्या तीन नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केल्यानं भाजपाच्या नगरसेवकांची संख्या आता 17 झालीय. तर त्यांच्याकडं 1 खासदार (चंदीगडचे भाजपा खासदार किरण खेर) यांचंही मत आहे. याशिवाय नुकत्याच झालेल्या महापौर निवडणुकीत शिरोमणी अकाली दलाच्या एकमेव नगरसेवकानंही भाजपाला पाठिंबा दिला होता. म्हणजे भाजपाकडे आता एकूण 19 मतं आहेत. नगरसेवकांच्या संख्येच्या बाबतीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरलाय. तीन नगरसेवकांच्या पक्षांतरानंतर आम आदमी पार्टी आणि काँग्रेसच्या मतांची संख्या आता 20 वरुन 17 वर आलीय. यात काँग्रेसच्या 7 आणि आपच्या 10 नगरसेवकांचा समावेश आहे. चंदिगड महापालिकेत एकूण 35 नगरसेवक आहेत, तर एका खासदाराचं मतही यात पकडलं जातं. यामुळं एकूण मतांची संख्या 36 आहे. यामुळं बहुमताला 19 मतं आवश्यक आहेत. तर भाजपाकडं सध्या 20 मतं आहेत.