मुंबई -2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 2029 पर्यंत भाजपा स्वबळावर निवडणूक लढवेल, असे सांगून आतापासूनच राज्यात राजकीय भूकंप केलाय. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर पुढील महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती राज्यात पुन्हा सत्ता स्थापित करण्यासाठी जोरकस प्रयत्न करीत आहे. अशा परिस्थितीत 2029 पर्यंत एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाला मागे सोडण्याचा डाव भाजपाने आखलाय. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले होते. परंतु मागील 10 वर्षांत राजकारणात कित्येक पटीने बदल झाले असून, २०२९ मध्ये भाजपा पुन्हा स्वबळावर सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. यामधील नेमकी कारणं काय असू शकतात? याचा सखोल अभ्यास आतापासून भाजपा करीत आहे.
भाजपाचा आलेख उतरणीला :पुढील महिन्यात होऊ घातलेल्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसलेली असताना महायुतीतील नेत्यांचं मनोबल उंचावण्यासाठी भाजपा नेत्यांचे मुंबईसह महाराष्ट्र दौरे सुरू झालेले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पाठोपाठ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेसुद्धा महाराष्ट्रात दौऱ्यावर येताहेत. यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे, राज्यात भाजपाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा प्रयत्न या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून केला जातोय. 2014 मध्ये पहिल्यांदाच लोकसभेत भाजपला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्पष्ट बहुमत मिळालंय. त्यानंतर नरेंद्र मोदी आता तिसऱ्यांदा पुन्हा पंतप्रधान झाले असले तरीसुद्धा भाजपाचा आलेख उतरणीला आलाय. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपा आघाडीवर असेल आणि सर्वात जास्त भाजपाचे खासदार निवडून येतील, अशी पूर्ण अपेक्षा भाजपाच्या नेत्यांना असताना निवडणुकीच्या निकालानंतर त्यांचा पूर्णपणे हिरमोड झालाय. एकनाथ शिंदेंनी फोडलेली बाळासाहेबांची शिवसेना आणि अजित पवार यांनी फोडलेली शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमुळे राज्यातील राजकारणाची समीकरणे पूर्णतः बदलली गेलीत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला विशेषतः भाजपाला मोठ्या प्रमाणात बसल्यावर शिक्कामोर्तब झालंय.
युतीला मजबूत ठेवणारे नेते नाहीत :शिवसेना-भाजपाची 25 वर्षांची युती 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तुटली. या घटनेला आता 10 वर्षं पूर्ण झाली असून, या दहा वर्षांमध्ये राजकारणात अनेक चढ-उतार झालेत. बाळासाहेब ठाकरेंच्या एका शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्यात. तर शरद पवार यांच्या एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन राष्ट्रवादी काँग्रेस झाल्यात. इतकेच नाही तर ज्या भाजपाच्या नेत्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, त्या नेत्यांनाच भाजपाने आपल्या पक्षात घेतल्याने एक चुकीचा संदेश जनतेमध्ये पसरला गेलाय, याचा पुरेपूर फायदा महाविकास आघाडीनं घेतलाय. अजित पवार यांना साथीला घेतल्याने त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत भाजपाला बसला, असा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केल्यानंतर ते भाजपा नेत्यांनाही विशेषत: देवेंद्र फडणवीस यांनाही मान्य करावं लागलं. शिवसेना-भाजपा युती घट्ट राहण्यासाठी पूर्वी गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्यासारखे ज्येष्ठ नेते कसोशीने प्रयत्न करतायत. बाळासाहेब ठाकरेसुद्धा सामोपचाराने हा विषय हाताळत असतं. तसेच सत्तेपासून नेहमी दूर राहून सत्तेचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात ठेवणारे हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आता हयात नसल्याने त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या आणि पुत्र प्रेमाच्या लालसेपोटी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे.
वर्तमान अन् भविष्याची स्थिती ओळखून पावलं : विशेष म्हणजे भाजपाने आपली कट्टर हिंदुत्वाची भूमिका कायम ठेवलेली असताना दुसरीकडे अजित पवारांचा राष्ट्रवादी अल्पसंख्याक समाजाच्या मतांच्या भरवशावर आपली ताकद वाढवण्याच्या तयारीत आहे. एका ठिकाणी भाजपाच्या कार्यकर्त्यांना अजित पवार यांची अल्पसंख्याकांना चुचकारण्याची भूमिका अडचणीची वाटतेय. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांना भाजपाची पूर्णतः हिंदुत्ववादी भूमिका खटकतेय. अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना राज्यात घडलेल्या प्रत्येक सकारात्मक गोष्टीचं श्रेय घेण्याच्या तयारीत आहे. म्हणूनच वर्तमानातील या सर्व घडामोडी बघता येणाऱ्या भविष्यातील राजकीय बदलाचे वारे पाहून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी २०२९ च्या निवडणुकीत भाजपा स्वबळावर असेल, अशी भाषा वापरलीय. तर अमित शाह यांच्या या विधानामुळे महायुतीत त्याचे उलट प्रतिसाद उमटू शकतात हे ओळखल्याने भारतीय जनता पक्षाचे नेते, मंत्री, गिरीश महाजन यांनी विरोधक अमित शाह यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावत आहेत, असे सांगितले आहे. तर "2029 ला अजून उशीर आहे", अशा एका वाक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाहा यांना उत्तर दिलंय.
हेही वाचाः