लखनौ Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक उमेदवारांची घोषणा करण्यात आलीय. मात्र, या यादीत भाजपा खासदार वरुण गांधी, मनेका गांधी, ब्रिजभूषण शरण, संघमित्रा मौर्य आणि जनरल व्ही. के. सिंह यांची नावं नाहीत. अशा स्थितीत त्यांच्या तिकिटावर प्रश्नचिन्ह कायम आहेत.
दिग्गजांच्या नावांचा पहिल्या यादीत समावेश नाही : सध्या वरुण गांधी पिलीभीतमधून खासदार आहेत. मेनका गांधी सुलतानपूर मतदारसंघातून, ब्रिजभूषण शरण सिंह कैसरगंजमधून, स्वामी प्रसाद मौर्य यांची कन्या संघमित्रा मौर्य बंडायू आणि जनरल व्हीके सिंह गाझियाबादमधून खासदार आहेत. हे सर्व भाजपाचे दिग्गज नेते आहेत. भाजपानं शनिवारी जाहीर केलेल्या उत्तर प्रदेशातील 51 लोकसभा उमेदवारांच्या यादीत या खासदरांची नावं नाहीत. अशा स्थितीत त्यांच्या उमेदवारीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
वरुण आणि मनेका गांधी यांच्याबाबत मौन : वरुण आणि मनेका यांच्या तिकीटावर भाजपानं मौन बाळगण्याचं कारण म्हणजे वरुण गांधी यांनी गेल्या पाच वर्षांत अनेकदा भाजपाविरोधात टीका केलीय. त्याचबरोबर त्यांची आई मनेका गांधी यांच्याबाबतही अनेक चर्चा रंगल्या होत्या. या दोघांबाबत भाजपाकडून बाळगण्यात येणारं मौन हे वेगळे संकेत देत आहेत. आता पहिल्या यादीत त्यांची नावं नसल्यामुळं चर्चेला उधाण आलंय. आता दुसऱ्या यादीत दोघांनाही तिकीट मिळतं की भाजपा नवे चेहरे पुढं आणणार हे पाहणं, उत्सुकतेचं ठरणार आहे.
ब्रिजभूषण शरण सिंह आणि संघमित्रा मौर्य यांच्या तिकिटांवरही सस्पेन्स : ब्रिजभूषण शरण सिंह आणि संघमित्रा मौर्य यांच्या तिकिटांबाबतही भाजपानं आपले पत्ते उघडलेले नाहीत. कुस्तीपटूंशी झालेल्या भांडणानंतर नुकतेच प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याबाबत भाजपानं मौन बाळगलंय. पहिल्या यादीत त्यांचं नाव नसल्यानं खेळाडूंची नाराजी कुठेतरी दूर करण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. तर यापूर्वी आपल्या वादग्रस्त विधानांमुळं चर्चेत असलेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांची कन्या संघमित्रा मौर्य यांच्या तिकिटावर भाजपानं मौन बाळगल्यानंही चर्चेला उधाण आलंय. एकंदरीत वादाच्या भोवऱ्यात पडलेल्या भाजपाच्या नेत्यांना तिकीट मिळणं हे सहजशक्य होणार नाही.
हेही वाचा :
- 'अजून युती झालेली नाही,...'; प्रकाश आंबेडकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
- वाराणसीतून तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींची खास पोस्ट, म्हणाले,...
- भाजपाच्या पहिल्या यादीत राज्यातील एकाच नेत्यावर 'कृपा', उत्तर प्रदेशातून दिलं लोकसभेचं तिकीट