महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

लोकसभा निवडणूक निकाल 2024: 'या' सात मतदारसंघातील प्रस्थापितांना धक्का, का पडले दिग्गज? घ्या जाणून - Lok Sabha Election Results 2024

Lok Sabha Election Results 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी अनेक दिग्गजांना पराभवाची चव चाखायला लावली आहे. नाशिक, दिंडोरी, अहमदनगर, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, बीड या मतदारसंघात प्रस्थापितांना अगदी सर्वसामान्य नेत्यांनी मिळवलेले विजय मतदारांची मानसिकता दाखवणारे आहेत अशा प्रतिक्रिया, जाणकारांनी व्यक्त केल्या आहेत.

Lok Sabha Election Results 2024
लोकसभा निवडणूक निकाल 2024 (ETV BHARAT ETV HM DESK)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 5, 2024, 6:59 PM IST

Updated : Jun 5, 2024, 8:43 PM IST

मुंबई Lok Sabha Election Results 2024 :राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा जनतेच्या मनातील भावनांचा अंदाज घेणं कठीण आहे. राज्यातील जनतेला तुम्ही फार काळ गृहीत धरू शकत नाही. जनतेच्या मुद्द्यावर आणि विकासाच्या मुद्द्यांवरच केवळ निवडणुका लढवल्या जाऊ शकतात. जनतेला फार काळ भावनिक करून आणि जाती-धर्माचे मुद्दे मांडून विजय मिळवता येत नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाल्याची प्रतिक्रिया, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजय चोरमारे (Vijay Chormare) यांनी व्यक्त केली आहे.

दिग्गज उमेदवारांना चारली धूळ :राज्यातील प्रस्थापित आणि दिग्गज उमेदवारांना जनतेनं अक्षरशः धूळ चारली आहे. धनशक्तीचा किंवा दडपशाहीचा प्रभाव फार काळ टिकत नाही हे या निवडणुकीतून स्पष्ट झालय. याची उदाहरणे म्हणजे सर्वसामान्य वाटणाऱ्या उमेदवाराने दिग्गजांना दिलेले धक्के आहेत. नाशिकच्या मतदारसंघातील राजाभाऊ वाजे आणि दिंडोरी मतदार संघातील भास्कर भगरे तर अमरावती मतदारसंघातील बळवंत वानखडे ही काही यातील ठळक उदाहरणे आहेत असं विजय चोरमारे म्हणाले.


'या' मतदार संघातील निकाल धक्कादायक : नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार होते. त्यांचा या मतदारसंघात मोठा प्रभाव आहे. जातीचं समीकरण पाहिलं तर मराठा मतदार हा त्यांच्यासोबत राहील अशी चर्चा होती. मात्र राजाभाऊ वाजे यांना मराठा मतदारांसोबतच ओबीसी मतदारांची ही मोठी साथ मिळाली. छगन भुजबळ हे रिंगणात नसल्यामुळं ओबीसी मतदारांनी राजाभाऊ वाजे यांना पसंती दिल्याचं दिसतंय.

भारती पवार यांचा पराभव :सिन्नर येथील एका सर्वसामान्य नेत्याने दिलेली ही टक्कर निश्चितच कौतुकास्पद आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातील काही कळीच्या मुद्द्यांवर वाजे यांनी नेमकं बोट ठेवलं आहे. तर नाशिकच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात शिक्षक असलेल्या भास्कर भगरे यांनी माजी केंद्रीय मंत्री भारती पवार यांचा दारुण पराभव केलाय. भारती पवार यांनी मतदारांची केलेली निराशा त्याचसोबत या पट्ट्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा सरकारवर असलेला रोष हा सर्वसामान्य शिक्षक उमेदवार असलेल्या भास्कर भगरे यांच्या पथ्यावर पडला. त्यामुळं भास्कर भगरे या स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराला जनतेनं स्वीकारलं आणि भारती पवार यांचा पराभव झाला.

धनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढाई: मराठवाड्यातील बीड मतदार संघातील अत्यंत अटीतटीची चुरस भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्यात पाहायला मिळाली. या मतदारसंघात पंकजा मुंडे यांची स्वतःची असलेली पकड त्यासोबत विद्यमान मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली साथ यामुळं त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा प्रभाव हा बजरंग सोनावणे यांना मदत करणारा ठरला. मराठा समाजानं एक गठ्ठा मतदान बजरंग सोनावणे यांच्या पारड्यात टाकलं. त्यामुळं या मतदारसंघात धनशक्ती आणि जनशक्ती यांच्यात लढाई झाली असं म्हटलं जातं. याच पद्धतीनं अमरावती मतदारसंघात विद्यमान खासदार आणि भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आणि काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी अत्यंत कडवं आव्हान उभे केलं होतं. या मतदारसंघातही 'धनशक्ती विरुद्ध जनशक्ती' असाच संघर्ष पाहायला मिळाला. मात्र स्थानिक मतदार आणि अल्पसंख्याक मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवारामागे उभी केलेली शक्ती त्यांना विजय मिळवून देणारी ठरली.

भाजपाच्या बालेकिल्याला खिंडार : भारतीय जनता पक्षाचा आणि महायुतीचा बालेकिल्ला असलेले मतदार संघ म्हणजे वर्धा आणि रामटेक. या दोन्ही मतदारसंघात भाजपा आणि शिवसेनेचा प्रभाव होता. मात्र काँग्रेसनं अत्यंत जोरदार मुसंडी मारत या दोन्ही मतदारसंघात तुलनेनं अत्यंत नवखे असलेले उमेदवार दिले. मात्र उमेदवार जिंकून आले. श्याम कुमार बर्वे आणि अमर काळे या दोन्ही उमेदवारांनी दिलेली लढत अतिशय तुल्यबळ होती. या मतदारसंघातील ओबीसी मतदार आणि धान उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी सरकारला भोवली. दिग्गज उमेदवारांना पाणी पाजत मतदारांनी नव्या उमेदवारांवर विश्वास टाकला आहे. त्याचप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातही विद्यमान मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी जोरदार लढत दिली. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रचारादरम्यान केलेली वक्तव्यं आणि महिलांचा केलेला अपमान हा त्यांना पराभवापर्यंत घेऊन गेला. प्रतिभा धानोरकर यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेत जनतेची सहानुभूती मिळवली आणि प्रचंड बहुमताने विजय मिळवला.


निलेश लंके यांनी विखेंना चारली धूळ: अहमदनगर लोकसभा मतदारसंघ हा राधाकृष्ण विखे पाटील यांचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो. या मतदारसंघातून विखे यांच्या असलेल्या संस्था आणि अन्य प्रभावामुळं विखे पाटील हे निश्चित विजय होणार असं मानलं जात होतं. मात्र, जनतेने पुन्हा एकदा सर्वसामान्य नेत्यावर विश्वास दाखवला. सुजय विखे पाटील यांना निलेश लंके या सर्वसामान्य आमदाराने पराभूत केलं, ते केवळ जनतेमध्ये असलेल्या त्यांच्या प्रतिमेमुळं. कोरोना कालावधीत केलेलं काम आणि लोकांमध्ये सातत्यानं असलेला संपर्क अत्यंत लो प्रोफाइल राहणं आणि लोकांमध्ये त्यांच्यातला एक कार्यकर्ता होऊन वावरणं यामुळंच जनतेनं निलेश लंके यांना पसंती दिली.

हेही वाचा -

  1. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयानंतर शिर्डीत उंटावरुन साखर वाटून जल्लोष - Lok Sabha Election Result
  2. भुमरेंनी खैरेंना दाखवला चंद्र, मराठा आंदोलनामुळं बदललं समीकरण - Aurangabad Lok Sabha Result 2024
  3. पराभवाची सगळी जबाबदारी माझी, मला मंत्रिमंडळातून मोकळं करा : देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय? - Devendra Fadnavis On Election Result
Last Updated : Jun 5, 2024, 8:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details