नंदुरबार Rahul Gandhi Speech : महाराष्ट्रात आज (12 मार्च) भारत जोडो यात्रेचा शुभारंभ नंदुरबार जिल्ह्यातून कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली झाला. यावेळी राज्यभरातून काँग्रेसचे नेते नंदुरबार येथे दाखल झाले होते. हेलिकॉप्टरनं राहुल गांधी नंदुरबारमध्ये दाखल झाले. त्यानंतर वाहनातून त्यांनी शहरात रोड शो केला आणि सभास्थळी दाखल झाले. या सभेतील भाषणादरम्यान राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपावर हल्लाबोल केला. तसंच पंतप्रधान मोदींनी 20-25 उद्योगपतींचं 16 लाख कोटींचं कर्ज माफ केल्याचा गंभीर आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला.
नेमकं काय म्हणाले राहुल गांधी? : यावेळी बोलत असताना राहुल गांधी म्हणाले की, "आदिवासी हेच देशाचे खरे मालक आहेत, मात्र त्यांनाच त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवलं जातंय. या देशातील जल, जंगल आणि जमिनीवर पहिला अधिकार आदिवासींचाच आहे. पण भाजपा आदिवासींना वनवासी म्हणत हक्कापासून वंचित ठेवतंय. भाजपा सरकार आदिवासींचं जंगल, जमीन ताब्यात घेऊन अदानीला देत आहे. तसंच भाजपामुळंच या समाजाचं अस्तित्व धोक्यात आलंय. याच 20-25 उद्योगपतींचं 16 लाख कोटींचं कर्ज नरेंद्र मोदींनी माफ केलंय. मात्र, आदिवासी समाजाचं एक रुपया कर्ज त्यानी माफ केलं नाही", असा गंभीर आरोप त्यांनी केला.