छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Bala Nandgaonkar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये आज (20 एप्रिल) मनसेचा पदाधिकारी मेळावा पार पडला. या मेळाव्याला मंत्री संदिपान भुमरे यांची देखील उपस्थिती होती. तर महायुतीच्या प्रचार कार्यालयाच्या स्तंभ पूजनाच्या बॅनरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो नसल्यामुळं मनसैनिकांमध्ये नाराजीचं वातावरण होतं. त्यामुळं त्यांची मनधरणी करण्यासाठी हा मेळावा होता. तर यावेळी 'फोटोसाठी विचार न करता आता सर्वांनी एकमतानं काम करा', असं आवाहन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केलं.
योग्य सन्मान राखा : यावेळी बोलत असताना बाळा नांदगावकर म्हणाले की, युती करताना दूरचा विचार करून निर्णय घ्यावा लागतो. तसा विचार पक्ष प्रमुखांनी केला असून त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. निवडणुकीत उमेदवारांना कार्यकर्त्यांची जोड देण्यात आली असून कार्यकर्त्यांना कामाला लागा हे सांगण्यासाठी मी इथं आलोय. कार्यकर्त्यांना अपेक्षा असते, आमच्या साहेबांनी मान सन्मान देण्याची विनंती केली. मात्र, महायुतीच्या कार्यालय उद्घाटन कार्यक्रमात निमंत्रण नाही, साहेबांचा फोटोही नाही. पुढं ते म्हणाले की, आमचा कार्यकर्ता 18 वर्ष झालं शक्य होईल तितकं काम करतोय. निवडणुकीच्या काळात मोठा खर्च असतो, या काळात जेवढं शक्य होईल तितकी मदत करू, असंही ते म्हणाले.
...त्यामुळं आम्ही लढलो नाही : आमचं बंद दाराआड काही नसतं. दक्षिण मुंबईची जागा मनसेनं मागितली होती, आणि ती द्यायला ते तयारही झाले होते. मात्र, पक्ष चिन्ह त्यांचं वापरण्याची अट असल्यानं आम्ही निवडणूक लढवली नाही. आम्ही केवळ त्यांना पाठिंबा दिला, असं नांदगावकर यांनी सांगितलं. राज्यात आता महायुतीसोबत असल्यानं कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आम्ही तन आणि मनाने सोबत आहोत, आम्ही सत्तेत नसल्यानं आमच्याकडे धन नाही त्यामुळे ते तुम्ही बघा असा सल्ला त्यांनी महायुतीतील उमेदवारांना दिला. तर आमचा योग्य सन्मान राखा असंही त्यांनी सांगितलं.
चांगल्या निर्णयाला पाठिंबा दिला :पुढं ते म्हणाले, "मागे मोदी साहेबांवर राग होता. मात्र, ते उत्तम पंतप्रधान होऊ शकतात हे राज ठाकरे यांनी सर्वात आधी सांगितलं. मात्र कधी कधी आवश्यक गोष्टी होत नाही. तेव्हा त्यांनी टीका केली. मनमोहन सिंह असताना ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी अमेरिका अनु करार आणला त्यावेळी आम्ही पाठिंबा दिला, महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यासाठी बिल आणलं, त्याला आम्ही पाठिंबा दिला. जे देशाच्या हिताचं वाटलं त्याला आम्ही पाठिंबा दिला. आम्ही देशाच्या विकासाविषयी विचार केला इतर लोकांसारखं केलं नाही", असंही ते यावेळी म्हणाले.
हेही वाचा -
- राहुल शेवाळेंनी घेतली राज ठाकरेंची भेट, 18 वर्षानंतर राज करणार धनुष्यबाणाला मतदान - Lok Sabha Election 2024
- राज ठाकरेंनी उष्णतेच्या लाटेवरुन हवामान विभागाला झापलं; काय म्हणाले नेमकं? - Raj Thackeray on Weather Department
- मनसेच्या एन्ट्रीमुळं नाशिकमध्ये महायुतीच्या उमेदवाराला फायदा होणार? काय म्हणाले राजकीय तज्ज्ञ? - lok sabha election 2024