छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी (9 नोव्हेंबर) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची छत्रपती संभाजीनगरमध्ये पूर्व मतदार संघाचे भाजपा उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “सुन लो ओवैसी, हे छत्रपती संभाजीनगर आहे, औरंगाबाद नाही”, असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिलाय.
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? : एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील पहिल्यांदाच भाजपाचे मंत्री अतुल सावे यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सावे यांच्या प्रचारासाठी स्टार प्रचारक म्हणून पहिली जाहीर सभा देवेंद्र फडणवीस यांनी सिडको भागात घेतली. यावेळी त्यांनी थेट असदुद्दीन ओवैसी थेट इशारा दिला. "सुन लो ओवैसी, हे छत्रपती संभाजीनगर आहे. याचं नाव आता कोणीही बदलू शकत नाही. असं सांगत हे शहर कालही भगवं होतं. आजही आहे आणि उद्याही भगवंच राहणार", असं फडणवीस म्हणाले. तसंच लोकसभा निवडणुकीत सहा जागांवर व्होट जिहादचा फटका महायुतीला बसला. त्यामुळं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे' या विधानाचा संदर्भ देत जर ते वोट जिहाद करणार असतील तर आम्हालाही मतांचं धर्मयुद्ध करावंच लागेल, असं फडणवीसांनी ठणकावून सांगितलं.
देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगर सभा (ETV Bharat Reporter) औद्योगिक विकास आणि महिलांसाठी योजना : पुढं छत्रपती संभाजीनगरच्या विकासकामांवर भर देत ते म्हणाले की, "जेएसडब्ल्यू, अथर, लुब्रीझोल, आणि टोयोटा किर्लोस्कर सारख्या कंपन्यांची 73,000 कोटींची गुंतवणूक इथं झाली आहे. पुढील काळात आणखी 1 लाख कोटीच्या करारांची अपेक्षा आहे", असं त्यांनी सांगितलं. याशिवाय, संभाजीनगरात नवीन क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावरही फडणवीसांनी महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिलांसाठी ‘लेक लाडकी’, ‘लखपती दिदी’ यांसारख्या योजना आणल्या आहेत. मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळेल, यासाठी आम्ही विशेष योजना राबवली आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं.
पाणीप्रश्न निकाली काढण्याची ग्वाही : मराठवाड्यातील पाणीटंचाईच्या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले, "समुद्राला वाहून जाणारे 54 टीएमसी पाणी गोदावरी पात्रात वळवून मराठवाड्याच्या पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्याचं आमचं ध्येय आहे. यामुळं भविष्यातील पिढ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागणार नाही." तर महिलांसाठी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत फडणवीस म्हणाले की, "आमच्या सरकारनं 2.50 कोटी महिलांना नोव्हेंबरपर्यंत पैसे दिले आहेत. विरोधकांनी या योजनेला विरोध केला असला तरी आम्ही महिलांसाठी उभं राहणार आहोत." तसंच, लाडकी बहीण योजनेतून महिलांना आता दर महिना 2100 रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली.
हेही वाचा -
- "आम्ही सख्खे भाऊ, महाविकास आघाडीत बहिणींचे सावत्र भाऊ", फडणवीसांचा विरोधकांना टोला
- कराड उत्तरची भाकरी फिरवा, २५ वर्षांचा बॅकलॉग भरून काढतो; देवेंद्र फडणवीसांची गॅरंटी
- मोदी यांच्या कार्यकाळात मुस्लिम समाजावरील अत्याचार वाढले; असदुद्दीन ओवैसी यांची प्रतिक्रिया - ASADUDDIN OWAISI