मुंबई Anil Parab On Eknath Shinde : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मिशन ४५ चा नारा भाजपानं दिला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचा सर्वाधिक जागा पारड्यात पाडून घेण्याचा प्रयत्न आहे. शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या महायुतीत जागा वाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. दिल्ली स्तरावरून देखील यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. शिवसेना (ठाकरे) नेते अनिल परब यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde )यांना लक्ष्य केलं. सेनेत फूट पडल्यानंतर बाळासाहेबांनी कधी झुकायला शिकवलं नाही. आम्ही कोणासमोर झुकणार नाही. सोबत आलेल्या सर्वच आमदार, खासदारांना मोठ्या संख्याबळानं निवडून आणणार, अन्यथा राजीनामा देईन अशी घोषणा केली होती. परंतु सध्या महायुतीतील जागा वाटपाच्या चर्चेवरून शिंदेंनी खासदारांना निवडून आणणं सोडा, विद्यमान खासदारांना उमेदवारी मिळवून द्यावी. नाही तर थेट राजीनामा द्यावा, अशी मागणी परब यांनी केलीय.
तर दिघे यांचा फोटो काढून टाकावा : दिवंगत नेते आनंद दिघे यांनी बाळासाहेबांना गळ घालून ठाणे हा मतदार संघ शिवसेनेच्या ताब्यात घेतला. आजवर ही जागा शिवसेनेकडं आहे. सध्या शिंदेंच्या महायुतीत भाजपाने या जागेवर दावा ठोकला आहे. शिंदे यांनी जर ठाण्याची जागा भाजपाला दिल्यास दिघे यांचा फोटो त्यांनी कार्यालयातून यापुढे काढून टाकावा, असं परब (Anil Parab) यांनी ठणकावलं.
संजय निरुपम यांचा आटापिटा: उत्तर-पश्चिम मुंबई मतदार संघातून अमोल कीर्तीकर यांना ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर कॉंग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी नाराजी व्यक्त केलीय. मात्र, पक्षात त्यांना काहीच स्थान नाही. निवडणूक लढविण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू असल्याचं परब म्हणाले. गजानन कीर्तीकर, आमदार रवींद्र वायकर आणि भाजपाच्या किरीट सोमैया यांचा तीव्र शब्दांत समाचार घेतला.