मुंबई :राज्यातील विधानसभा निवडणुकीला अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. तर निवडणूक प्रचार करण्यास पाच दिवस बाकी आहेत. निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. अशातच सत्ताधारी-विरोधक मतदारसंघात पैसे वाटल्याच्या कारणावरून आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान, वरळी मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी काही महिलांना भांडी वाटप आणि पैसे वाटल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे. याबाबत व्हिडिओसुद्धा असून मिलिंद देवरांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, याबाबत निवडणूक आयोगाकडे पत्र दिलं आहे. मात्र, अजूनही निवडणूक आयोगानं यावर कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळं आज आम्ही राज्य निवडणूक आयुक्त एस. चोक्कलिंगम यांची भेट घेऊन पुन्हा त्यांना याबाबत पत्र दिलं आहे. यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे, असं ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी सांगितलं. आज त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
निवडणूक आयोगानं कारवाई करावी : पत्रकार परिषदेत बोलताना अनिल परब म्हणाले, "वरळीच्या बाबतीत कोणतीही कारवाई झाली नाही. मुंबईसह राज्यातील काही ठिकाणच्या मतदारसंघात कुकर, पैसे आणि टॅब वाटले गेले. आमिष दाखवून मतं विकत घेतली जात आहेत," असा गंभीर आरोप अनिल परब यांनी शिवसेनेवर केला. "वरळीनंतर आता जोगेश्वरीमध्ये सुद्धा पैसे वाटण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिथं आमच्या कार्यकर्त्यांनी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, रवींद्र वायकरांच्या आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. मोठा राडा घातला आणि आमच्यावर गंभीर आरोप केले. आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. रवींद्र वायकर यांचा मातोश्री क्लब हा अनाधिकृत आहे. याची चौकशी होत होती. या चौकशीच्या भीतीनं रवींद्र वायकर हे शिंदेंच्या शिवसेनेत पळाले. आताही तिथं बेकायदेशीर कामं चालवली जात आहेत. मंगळवारी झालेल्या राड्यात सगळे गुंड लोक होते. गुन्हेगार लोकांना हाताशी धरून जोगेश्वरीत दहशत निर्माण केली जात आहे. आमची मागणी आहे की, निवडणुका होईपर्यंत मातोश्री क्लब हा बंद करण्यात यावा. निवडणूक आयोगानं याच्यावर कारवाई करावी," अशी मागणी अनिल परब यांनी केलीय.