महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

का रे दुरावा? गंभीर आरोपांच्या फैरीनंतर फडणवीस-देशमुख एकाच मंचावर,पण... - Devendra Fadnavis vs Anil Deshmukh - DEVENDRA FADNAVIS VS ANIL DESHMUKH

Devendra Fadnavis vs Anil Deshmukh : गेल्या काही दिवसांपासून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मोठं शाब्दिक युद्ध रंगलंय. मात्र, असं असताना आज (2 ऑगस्ट) हे दोन्ही नेते एका शासकीय उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं पहिल्यांदा एकाच मंचावर दिसले. मात्र, दोन्ही नेत्यांमध्ये अबोला दिसून आला.

Anil Deshmukh and DCM Devendra Fadnavis at one platform in Nagpur
देवेंद्र फडणवीस, अनिल देशमुख एकाच मंचावर (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 2, 2024, 6:55 PM IST

नागपूर Devendra Fadnavis Vs Anil Deshmukh : नागपूर जिल्ह्यातील झिल्पा, भोरगड आणि घाटपेंढरी या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचा आज (2 ऑगस्ट) व्हर्चुअल पद्धतीनं लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमात माजी गृहमंत्री अनिल देशमुख हेदेखील उपस्थित होते. त्यामुळं या दोन्ही नेत्यांमध्ये काही संवाद होतो का? याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, मंचावरही दोन्ही नेत्यांमधील नाराजीनाट्य उघडपणे बघायला मिळालं.

दोन्ही नेत्यांनी एकमेकांकडं ढुंकूनही बघितलं नाही : महत्त्वाचं म्हणजे उद्घाटन झालेल्या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी झिल्पा आणि भोरगड हे दोन प्राथमिक आरोग्य केंद्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्या काटोल या मतदारसंघातील आहेत. त्यामुळं या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख एकाच मंचावर दिसले. हा लोकार्पण सोहळा सुरेश भट सभागृहात पार पडला. मात्र, संपूर्ण कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख या दोन्ही नेत्यांनी एकमेकांकडं साधं ढुंकूनही बघितलं नाही.

दोन्ही नेत्यांमधील वाद काय? : काही दिवसांपूर्वी माध्यमांशी संवाद साधत असताना अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, "उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांच्यावर आरोप करा. मग आम्ही तुम्हाला ईडीच्या प्रकरणातून मुक्त करू, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी माझ्यावर दबाव आणला होता." तसंच फडणवीसांनी पाठवलेल्या निरोप्याचं नाव समित कदम असल्याचं त्यांनी सांगितलं. तो आपल्याकडं यासंदर्भात पाच ते सहावेळा आला असल्याचा दावा देशमुखांनी केला. इतकंच नाही तर समित सोबतच्या संवादाची व्हिडिओ क्लिपसुद्धा आपल्याकडं असल्याचा दावाही देशमुखांनी केला. देशमुखांच्या या आरोपांना उत्तर देत देवेंद्र फडणवीसांनी आपल्याकडंदेखील अनिल देशमुखांचे रेकॉर्डिंग असल्याचं म्हटलं होतं.

आशा सेविकांना मोबाईल रिचार्जचे पैसे सरकार देईल : यावेळी बोलत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आज आपण तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचं लोकार्पण केलय. अनेक वर्षानंतर या भागातील नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध झाल्यात. आशा सेविकांनादेखील आपण चांगले मोबाईल दिलेत. त्यामुळं त्यांचा डेटा कलेक्शन नीट पद्धतीनं होईल. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आशा सेविकांचं मानधन वाढवलं", असं फडणवीस म्हणाले. मात्र, त्यानंतर लगेच आशा सेविकांनी आम्हाला वाढलेलं मानधन मिळालंचं नाही असं सांगितलं. त्यावर फडणवीसांनी या महिन्यापासूनच आशा सेविकांना वाढीव मानधन मिळेल, असं आश्वासन दिलं. आशा सेविकांना आज दिलेल्या मोबाईलचं रिचार्ज करावं लागणार नाही. शासन त्याचा खर्च उचलेल, असंही फडणवीसांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा -

  1. "...तर आज उद्धव ठाकरे जेलमध्ये असते", अनिल देशमुख यांचा मोठा गौप्यस्फोट - Anil Deshmukh Vs Devendra Fadnavis
  2. अनिल देशमुख-देवेंद्र फडणवीस वादात आता समित कदमांची एन्ट्री, नेमकं काय आहे प्रकरण? - Amit Deshmukh Vs Samit Kadam
  3. "...त्याचवेळी फडणवीसांवर एफआयआर का नाही केला?" चंद्रशेखर बावनकुळेंचा अनिल देशमुखांना सवाल - Chandrashekhar Bawankule

ABOUT THE AUTHOR

...view details