महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

अडसूळ, कडू यांचा विरोध असतानाही भाजपाकडून नवनीत राणांचं तोंड गोड - Amravati Constituency War - AMRAVATI CONSTITUENCY WAR

Amravati Constituency War : अमरावती लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपानं अंतर्गत विरोध असतानाही नवनीत राणा (Navneet Rana) यांना उमेदवारी दिल्यानं या मतदारसंघातील लढत फारच रंगतदार असणार आहे. वाचा काय होतील परिणाम.

Navneet Rana News
अमरावती लोकसभा मतदारसंघात रंगतदार लढत

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 28, 2024, 4:20 PM IST

मुंबई Amravati Constituency War: राज्यात दिवसेंदिवस उष्मा चढत असताना दुसरीकडं लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) निमित्तानं राज्यातील राजकारण हे दिवसेंदिवस तापू लागलं आहे. राजकीय पक्षांनी त्यांच्या उमेदवारांच्या केलेल्या घोषणेनं बऱ्याच मतदारसंघांमध्ये अंतर्गत विरोधासोबत आरपारची लढाई होणार आहे.

राणा यांची राजकीय आत्महत्या: अशातच बुधवारी अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपानं अंतर्गत विरोध असतानाही नवनीत राणा (Navneet Rana) यांना उमेदवारी दिल्यानं या मतदारसंघातील लढत फारच रंगतदार असणार आहे. नवनीत राणा यांची उमेदवारी त्यांच्यासाठी राजकीय आत्महत्या सुद्धा ठरू शकते? असंही चित्र या निमित्तानं सध्या तरी निर्माण झालय.



निवडणूक तारेवरची कसरत : अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपानं नवनीत राणा यांना उमेदवारी देऊन या मतदार संघातील लढत अधिक चुरशीची केली आहे. खासदार नवनीत राणा यांना या मतदारसंघातून मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी त्याचबरोबर माजी खासदार शिवसेना उबाठा गटाचे नेते आनंदराव अडसूळ त्यांचे पुत्र माजी आमदार अभिजीत अडसूळ, प्रहार जनशक्तीचे विद्यमान आमदार बच्चू कडू यांचाही मोठ्या प्रमाणामध्ये विरोध आहे. असं असतानाही भाजपा पक्ष श्रेष्ठींनी नवनीत राणा यांच्या नावावर शिक्का मोर्तब केलं. परंतु त्यांच्या उमेदवारीमुळं महायुतीतील इतर पक्षांकडून नवनीत राणा यांचं स्वागत होईल याची शक्यता धूसर आहे.

नवनीत राणा यांची तारेवरची कसरत : काँग्रेस पक्षाकडून या मतदार संघात दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बळवंत वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वानखडे यांच्या उमेदवारीला महाविकास आघाडीच्या इतर कुठल्याही पक्षाकडून विरोध किंवा नापसंती दाखविण्यात आलेली नाही. तर महायुतीच्या मित्र पक्षांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला उघडपणे विरोध केल्याने नवनीत राणा यांच्यासाठी ही निवडणूक तारेवरची कसरत असणार आहे.



असं आहे मतदारसंघावरील पक्षीय वर्चस्व: अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी (SC) राखीव मतदार संघ आहे. 1951 च्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून 1984 पर्यंत या मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व राहिलं आहे. त्यानंतर मात्र काँग्रेसला येथे धक्का बसला होता. 1991 मध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसला पुन्हा विजय संपादन करून दिला. परंतु त्यानंतर अद्याप काँग्रेसचा खासदार इथे निवडून आलेला नाही. 1999 पासून या मतदारसंघावर शिवसेनेचचं वर्चस्व राहिलेलं आहे. शिवसेनेचे अनंत गुढे हे 10 वर्ष आणि त्यानंतर शिवसेनेचेच आनंदराव अडसूळ यांनी 10 वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे.

तीन मतदारसंघात काँग्रेसचं वर्चस्व :अमरावती लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यामध्ये बडनेरा येथे युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि नवनीत राणा यांचे पती रवी राणा हे आमदार आहेत. अमरावती विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या सुलभा खोडके तसंच तिवसा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्याच यशोमती ठाकूर आणि दर्यापूर या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचेच बळवंत वानखेडे हे आमदार आहेत. मेळघाट या विधानसभा मतदारसंघात प्रहार जनशक्तीचे राजकुमार पटेल तर अचलपूर या विधानसभा मतदारसंघात प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष बच्चू कडू हे आमदार आहेत. एकंदरीत सहा विधानसभा मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघात काँग्रेसचे तर दोन मतदारसंघात प्रहार जनशक्ती पक्षाचं वर्चस्व आहे.



अडसूळ, कडू यांचा प्रखर विरोध: 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा यांचा पराभव केला होता. तर मागील 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. या मतदारसंघातून माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी निवडणुकीची पूर्ण तयारी केली होती. ही जागा आपल्याकडं घेण्यासाठी ते पूर्ण प्रयत्नशील होते. परंतु ही जागा भाजपानं नवनीत राणा यांना दिल्यानं आनंदराव अडसूळ यांचा हिरामोड झाला आहे. आनंद अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांनी एकत्र येत नवनीत राणा यांच्या विरोधात आता दंड थोपाटले आहेत.

अबकी बार 400 पार...: अमरावती मतदारसंघातून ते स्वतः किंवा त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ उभा राहणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. कुठल्याही परिस्थितीमध्ये माघार घेणार नाही. कारण नवनीत राणा यांची उमेदवारी महायुतीनं नाही तर ती भाजपानं घोषित केली आहे, असंही आनंदराव अडसूळ म्हणाले आहेत. तर दुसरीकडं प्रहार जनशक्तीचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनीही मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी व्यक्त केलीय. तसंच अबकी बार 400 पार असा पूर्ण आत्मविश्वास मोदींना असताना जर अमरावतीची एक जागा गमवावी लागली, तर त्यात दुःख करण्याचं कारण काय? असा खोचक टोलाही बच्चू कडू यांनी लगावला आहे.



वंचित बहुजन आघाडीचा मोठा फटका: मागच्या दोनवेळचा अमरावती लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहिला तर या दोन्ही निवडणुकीत वंचितच्या उमेदवाराचा मोठा फटका हा दुसऱ्या नंबरवर राहिलेल्या उमेदवाराला बसला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आनंदराव अडसूळ यांना 4,67,712 मतं मिळाली होती. त्यांच्या मतांची टक्केवारी ही 28.47 टक्के इतकी होती. नवनीत राणा यांना 3,29,280 मतं मिळाली होती. त्यांच्या मतांची टक्केवारी ही 20.42 टक्के इतकी होती. तर तिसऱ्या नंबरवर राहिलेल्या बहुजन समाज पार्टीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांना 98,200 मतं मिळाली होती आणि त्यांच्या मतांची टक्केवारी 6.09 टक्के इतकी होती.

अशी होती मतांची टक्केवारी :2019 च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना 5,10,947 मतं मिळाली होती आणि त्यांच्या मतांची टक्केवारी 45.87 टक्के इतकी होती. तर आनंदराव अडसूळ यांना 4,73,996 मतं मिळाली होती आणि त्यांच्या मतांची टक्केवारी 42.55 टक्के इतकी होती. तर तिसऱ्या नंबरवर राहिलेल्या 'वंचित' आघाडीचे गुणवंत देवपारे यांना 65,135 मते मिळाली होती आणि त्यांच्या मतांची टक्केवारी ही 5.58 टक्के इतकी होती. 2014 आणि 2019 या दोन्ही लोकसभा निवडणुकीवर प्रकाश टाकला तर वंचितच्या उमेदवारीच्या टक्केवारीनं या मतदारसंघावर मोठा प्रभाव पडून आलेला आहे. यंदाच्या 2024 च्या निवडणुकीतही प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनं या मतदारसंघात कुमारी प्राजक्ता पिल्लेवान यांना उमेदवारी देऊन पुन्हा अमरावती लोकसभा मतदारसंघाची लढत रंगतदार केली आहे.


माझ्या विरोधकांचा विरोध मावळेल : नवनीत राणांना अंतर्गत मोठ्या प्रमाणात होत आहे. या विषयावर आपली भूमिका स्पष्ट करताना नवनीत राणा म्हणाल्या की, जसजशी वेळ जाईल तसतशा सर्व गोष्टी स्पष्ट होत जातील. अमरावतीकरांचा पाठिंबा आणि आशीर्वाद हा नेहमी माझ्यासोबत कायम राहील. मागील पाच वर्षापासून मी एनडीएचं काम करत असून भाजपा नेत्यांनी माझ्या कामाची दखल घेऊन मला उमेदवारी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो 400 पारचा नारा दिला आहे त्या 400 जागांमध्ये एक जागा ही अमरावतीची सुद्धा असणार आहे. माझ्या उमेदवारीला विरोध करणाऱ्या सर्वांची नाराजी दूर होऊन सर्वजण एक दिलानं अमरावतीच्या विकासासाठी काम करतील.

हेही वाचा -

  1. 'हट्ट कुणाचाही असो, हक्क तुमचाच'; साताऱ्याच्या उमेदवारीसाठी अजित पवार यांना कार्यकर्त्यांचा आग्रह - Ajit Pawar Group
  2. "माझ्यावर वार कराल तर फाशी द्या. असंच सोडलं तर...,"; कॉंग्रेस नेते सुनील केदारांचा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा - SUNIL KEDAR reaction
  3. आघाडीत बिघाडी! उद्धव ठाकरेंनी आघाडी धर्म पाळला नाही; बाळासाहेब थोरात यांची स्पष्टोक्ती - MVA meeting over seat sharing

ABOUT THE AUTHOR

...view details