शिरुर Lok Sabha Election 2024 : ओतूरच्या सभेत डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना लक्ष करत, हे तर लोकप्रतिनिधीच्या वेशातील व्यापारी, असा थेट आरोप केला होता. त्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुरावे द्या, नाहीतर निवडणुकीच्या रिंगणातून माघारी घ्या, असं आव्हान दिलं होतं. डॉ. कोल्हे यांनी हे आव्हान स्वीकारल्याच सांगत, शब्द फिरवत माघार घ्यायची नाही, असं प्रति आव्हान आढळराव पाटलांना दिलं. त्यानंतर आज त्यांनी पुरावे दाखवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केलाय. डॉ. कोल्हेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायलर होतोय.
पुरावे दाखवणारा व्हिडीओ दाखल : आढळराव पाटलांनी लोकसभेत ७ एप्रिल २०१७ आणि १३ फेब्रुवारी २०१९ रोजी मांडलेल्या प्रश्नांची कागदपत्रे अमोल कोल्हे यांनी दाखवली आहेत. आढळराव पाटलांनी स्वतःच्या कंपनीच्या फायद्यासाठी पदाचा गैरवापर केला? असा सवाल उपस्थित करत याचं उत्तर त्यांनी जनतेला द्यावं, शिवाय मी पुरावे दिल्यावर लोकसभेच्या निवडणुकीतून बाहेर पडणार, हा दिलेला शब्द आता आढळरावांनी पूर्ण करावा, असं प्रती आव्हानही अमोल कोल्हेंनी दिलं आहे. तसेच 'हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है'. असं म्हणत १७ मार्च २०१७, ९ डिसेंबर २०१६ आणि २६ डिसेंबर २०१८ या तारखांना कंपनी हितासाठी मांडलेल्या प्रश्नांची आठवण करून दिली. सोबत कागदपत्रांचा गठ्ठा दाखवत हे सगळे पुरावे टप्याटप्याने जनतेसमोर मांडणार असल्याचा इशारा देत, कोल्हेंनी आढळरावांचं टेन्शन वाढवलं.