मुंबई- छत्रपती संभाजी महाराजांवरील "छावा" हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झालाय. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त लिखाण केल्यामुळे संभाजी महाराज आणि शिवप्रेमींमधून संतापाची लाट उसळत आहे. दरम्यान, विकिपीडियावरील वादग्रस्त लिखाण काढून टाकावे आणि संबंधित जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सायबर पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादवांना दिलेत. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री माध्यमांशी बोलत होते.
नियमावली तयार केली गेली पाहिजे : विकिपीडिया स्वतंत्र प्लॅटफॉर्म असले तरी त्याच्यावर काय लिहायचे याच्याबाबत एक निकष आणि नियम हे विकिपीडियाने घालून दिले पाहिजेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणजे तुम्ही काहीही करू शकता असं नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाही काही सीमा आहेत. त्यामुळे विकिपीडियाने छत्रपती संभाजी महाराजांवरील वादग्रस्त जो मजकूर आहे तो काढून टाकला पाहिजे आणि जे काही नियम आणि निकषांचं पालन केलं पाहिजे, असे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
असले लेखन खपवून घेतले जाणार नाही : दुसरीकडे वादग्रस्त अभिनेता कमाल खान यानेही विकिपीडियावरील छत्रपती संभाजीमहाराजांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण हे सोशल मीडियावर शेअर केलंय. त्यामुळे कमाल खानवर मोठ्या प्रमाणावर टीका होतेय. छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत. त्यांच्याबद्दलचं असले लेखन आम्ही कदापि खपवून घेणार नाही, असा सज्जड दमच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी दिलाय. तसेच आम्ही केंद्र सरकारची चर्चा करून विकिपीडियाबाबत लिखाणाबाबत काही नियमावली घालून देता येतील का, याबाबत चर्चा करीत आहोत. दरम्यान, विकिपीडियाने केलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या आक्षेप लिखाणाचा वादग्रस्त मजकूर काढल्याची ही माहिती समोर येत आहे. मात्र इंग्रजी मजकूर मात्र तसाच आहे. आता मुख्यमंत्र्यांनी विकिपीडियावरील कारवाईचे आदेश दिल्यानंतर पोलीस कोणती कारवाई करतात, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचाः
अभिमानास्पद! जपानच्या टोकियोत उभारणार शिवरायांचं स्मारक, 'या' तारखेला होणार उद्घाटन
शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी छ. शिवाजी महाराजांची रेखाटली रांगोळी, पाहा व्हिडिओ