मुंबई Ambadas Danve On Shinde Government : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज (1 मार्च) शेवटचा दिवस असतानाच शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे आपापसात भिडले असल्याचं बोललं जातय. या मुद्द्यावरुन आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाले अंबादास दानवे: यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना अंबादास दानवे म्हणाले की, सत्ताधारी पक्षामध्ये सध्या गँगवॉर सुरू असून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेत. सत्ताधारी पक्षातील एक आमदार पोलीस स्टेशनमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार करतो. त्यामुळं कायदा कुठंय? हे सरकार राज्यातील गुन्हेगारीला खतपाणी घालतंय. तसंच गुन्हेगारी थांबवण्यास या सरकारला अपयश आल्याचंही ते म्हणाले.
गॅंगवॉर आता पवित्र मंदिरात : पुढं ते म्हणाले की, राज्यात सध्या पेपर फुटीचे प्रकार वाढतायत, मंत्रालयात गुन्हेगार रिल्स काढत फिरताय, गुंड मुख्यमंत्र्यांना भेटतायत आणि आता हीच गुंडांची गॅंगवॉर पवित्र विधान भवनाच्या मंदिरापर्यंत पोहोचली आहे. आज सत्ताधारी पक्षातील दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यात विकास कामावरून धक्काबुक्की झाल्याचं आम्हाला माध्यमातून समजलं. या ठिकाणी राज्यातील तळागाळातील जनसामन्यांचे प्रश्न सोडवले जातात आणि याच पवित्र मंदिरात हे दोन आमदार एकमेकांना धक्काबुक्की करतात. हे अत्यंत चुकीचं आहे. या सरकारचा कशावरच वचक राहिलेला नाही.