अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपा, मविआ आणि वंचितनं उमेदवार जाहीर केले आहेत. या लोकसभा निवडणुकीत तिहेरी लढत पहावयास मिळत आहे. मात्र, तिहेरी लढतीत महाविकास आघाडीनं प्रचारात मोठी आघाडी घेतल्यानं भाजपाला आपला बालेकिल्ला राखण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागत आहे. त्यामुळे भाजपाचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी अमित शाह यांची आज सभा आयोजित करण्यात आली आहे.
भाजपातील पदाधिकाऱ्यांची नाराजीला दूर करण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा हा महत्त्वाचा ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपानं ऐनवेळी खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर महाविकास आघाडीसोबत जागवाटपावरून मतभेद झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र निवडणुक लढणार असल्याचे जाहीर केले. मविआनंही आपला उमेदवार देत मराठा कार्ड म्हणून डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाचे अनुप धोत्रे आणि मविआचे डॉ. अभय पाटील हे पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत आपले नशीब आजमावित आहेत.
संजय धोत्रे यांच्याकडून प्रकाश आंबेडकर यांचा तीनवेळा पराभव-सूत्राच्या माहितीनुसार भाजपाच्या माजी खासदाराच्या पुत्राला लोकसभेची उमेदवारी दिल्यानं भाजपाचे अनेक नेते नाराज आहेत. त्यासोबतच पक्ष तर सोडाच राजकारणाशी तिळ मात्रही संबंध नसलेल्या अनुप धोत्रेंना उमेदवारी देऊन भाजपानं पक्षातीलच इच्छुक आणि बड्या नेत्यांच्या तोंडचा घास पळविल्यानं पक्षात नाराजीचा सूर आहे. विशेष म्हणजे, अकोला लोकसभा मतदारसंघातून चारवेळा भाजपाचे नेते संजय धोत्रे हे निवडून आले आहेत.