मुंबई Ajit Pawar Open Letter : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला उद्देशून भावनिक पत्र लिहिलंय. त्यात आपल्या राजकीय प्रवासाचा इतिहास सांगताना, मी केवळ विकास आणि कामांना महत्त्व देत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. तसंच भाजपा आणि शिवसेनेसोबत गेल्यानंतर होत असलेल्या टीकेवर अजित पवारांनी या पत्रातून स्पष्टीकरण दिलंय. विकासाची 'ब्लू प्रिंट' घेऊन राज्यातील जनतेसमोर येईन, अशी ग्वाही अजित पवारांनी आपल्या पत्रातून दिलीय.
पत्रात काय म्हणाले अजित पवार : अजित पवारांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलंय, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं भारतीय जनता पक्ष, शिवसेना यांच्यासोबत जाताना वेगळा विचार केला. त्याबाबत अनेक माध्यमातून विविध प्रकारे आजही चर्चा होत आहेत. याबाबत माझी भूमिका राज्यातील नागरिकांपर्यंत पोहोचावी या उद्देशानं या बाबत केलेला हा पत्रप्रपंच. सन 1991 पासून मी राजकीय जीवनात खऱ्या अर्थानं वाटचाल करत आहे. मला राजकारणात कोणी आणलं, कोणी मला मंत्रीपद दिलं, कोणी संधी दिली याबाबत अनेकदा चर्चा झाली. खरतर मला राजकारणात येण्याची संधी अपघातानंच मिळाली. त्याकाळी राज्यस्तरावर नेतृत्वासाठी एका युवकाची आवश्यकता होती. त्यामुळं कुटुंबीय म्हणून मला ती संधी मिळाली. संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं सोनं करण्यासाठी मी रात्रीचा दिवस केला, कष्ट व परिश्रम केले, इतर सर्व जबाबदाऱ्यांकडं दुर्लक्ष करुन समाजकारणासाठी स्वताःला वाहून घेतलं. तीन दशकांहून अधिक काळ हा प्रवास सुरु आहे. फक्त संधी मिळून चालणार नव्हतं तर त्याचा लोकांची कामं होण्यासाठी कसा उपयोग करता येईल, यावरच कायम माझा भर राहिला.''
लोकप्रतिनिधी म्हणून काम करायला सत्तेची जोड हवी : राजकारण करताना विकासालाच प्राधान्य दिल्याचं म्हणत अजित पवारांनी लिहिलंय, "पहाटे पाचपासून काम सुरु करण्याची सवय स्वताःला लावून घेतली. कारण हातात असलेल्या वेळेत समाजोपयोगी, विधायक व विकासाची कामं वेगानं मार्गी लागावीत. ज्या मतदारांनी भरभरून प्रेम केलं, विश्वास व्यक्त केला, त्यांचे जीवनमान अधिक कसं उंचावेल यासाठी कायमच मी प्रयत्न केला. पहिल्या दिवसापासून राजकारण समाजकारण करताना इतर कोणत्याही मुद्यापेक्षा विकासालाच सर्वाधिक प्राधान्य दिलं. आजही आणि भविष्यातही विकास हाच कायम माझा व माझ्या सर्व सहकाऱ्यांचा एककलमी कार्यक्रम असेल. काही काळ सत्ताधारी तर काही काळ विरोधक म्हणून दिवस पाहिलं. सत्तेत असताना असलेला कामाचा वेग आणि विरोधक असताना रखडलेली कामं दोन्हीचा अनुभव घेतला. जर लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचं असेल तर त्याला सत्तेची जोड हवी, ही वस्तुस्थिती नाकारुन चालत नाही. विचारधारा, ध्येयधोरणं यांच्याशी कोणतीही तडजोड न करता विकासकामं वेगानं मार्गी लागावेत, याच उद्देशानं वेगळी भूमिका घेतली. यात कोणाचाही अवमान करणं, कोणाच्याही भावना दुखाविणं, कोणालाही दगा देणं किंवा पाठीत खंजीर खुपसणं असा कोणताही उद्देश अजिबात नव्हता व कधीच नसेल. कायमच वडीलधाऱ्यांविषयी आदराची भावना, समवयस्कांना सोबत घेऊन जाणं व युवकांना विविध ठिकाणी संधी देण्याचंच काम माझ्याकडून झालंय. आजही मी फक्त भूमिका घेतली आहे, सत्ता असेल तर मतदारसंघासह राज्यातील सर्वच विकासकामं वेगानं मार्गी लागतील ही स्वच्छ भूमिका आहे, यात कोणाचाही कसलाही अनादर करण्याचा अजिबात हेतू नव्हता व नसेल."