मुंबई : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. राज्यातील निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाली. 20 नोव्हेंबरला सर्व उमेदवारांचं भविष्य मतपेटीत कैद होईल. या सर्वच उमेदवारांसाठी ही निवडणूक आपल्या भविष्याची लढाई असली, तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी मात्र, अस्तित्वाची लढाई असल्याचं राजकीय जाणकार सांगतात. राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अमित ठाकरे यांना निवडून आणण्यासाठी राज ठाकरे सर्व प्रयत्न करताना दिसून येत आहेत. तर, दुसरीकडे आपला पक्ष वाचवण्यासाठी देखील राज ठाकरे यांची लढाई दिसून येते. आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवायचं असल्यानं राज ठाकरेंसाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई बनली आहे. कारण, या निवडणुकीत मनसेला राज्यातील एकूण मतदानाच्या आठ टक्क्यांहून कमी मतदान झाल्यास मनसेची मान्यता रद्द होऊ शकते, असा निवडणूक आयोगाचा नियम आहे.
मनसेचे 123 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात : निवडणूक आयोगाच्या नव्या नियमानुसार, कोणत्याही राजकीय पक्षाला आपली मान्यता कायम राखायची असल्यास एकूण मतदानापैकी 6 टक्के मतदान आणि 2 आमदार किंवा 3 टक्के मतदान आणि तीन आमदार निवडून आणणे गरजेचं आहे. संबंधित पक्षाचा एकही आमदार निवडून न आल्यास त्या पक्षाला एकूण मतदानापैकी 8 टक्के मतं मिळवणं गरजेचं आहे. तसं न झाल्यास मनसे पक्षाची मान्यता धोक्यात येऊ शकते. 2009 मध्ये मनसेचे एकूण 13 आमदार निवडून आले. मात्र, त्यानंतर झालेल्या 2 विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेला केवळ एका आमदारावर समाधान मानावं लागल्याचं दिसून आलं. एकूण मतदानाचा विचार केला, तरी हे मतदान 8 टक्क्यांहून कमी असल्याचं दिसून येतं. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेनं एकूण 123 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत.
25 लाख मतं मिळवणं गरजेचं :महाराष्ट्रातील एकूण मतदारांची संख्या 9 कोटी 70 लाख इतकी आहे. यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत 61.29% मतदारांनी मतदान केलं. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत हीच मतदानाची सरासरी 60 टक्के इतकी होती. हीच सरासरी कायम राहील, असं पकडल्यास साधारण सहा कोटी मतदान होईल. आता या 6 कोटीतील 8 टक्के मतदान मनसेला मिळवणं आवश्यक आहे. म्हणजे या 8 टक्के मतांची संख्या साधारण 25 लाख इतकी होते. त्यामुळं या निवडणुकीत मनसेला 25 लाख मतं मिळवणं गरजेचं आहे.