हैदराबाद CARTOONIST S D PHADNIS : व्यंगचित्रकार शि द फडणीस म्हणजेच शिवराम दत्तात्रेय फडणीस हे एक भारतीय व्यंगचित्रकार आणि चित्रकार आहेत. ते त्यांच्या कॅप्शन-लेस आणि पेंट केलेल्या व्यंगचित्रांसाठी प्रसिद्ध आहेत. मुख्यतः मासिकांच्या मुखपृष्ठांवरची त्यांची व्यंगचित्रे खूपच लोकप्रिय झाली. फडणीस यांनी मोहिनी मासिकासाठी तयार केलेल्या चित्रांनी मराठी मासिकाच्या मुखपृष्ठांची नवी परंपरा प्रस्थापित केली. त्यांनी एकाही शब्दाचा वापर न करता मनाला लगेच भावतील आणि त्यातील कला पाहून लोकांना लगेच हास्यानंद मिळेल अशी असंख्य व्यंगचित्रं काढली. हीच त्यांची खासियत होती. आपल्या व्यंगचित्रकलेतून त्यांनी मराठी समाजाला तसंच कलाविश्वासाठी खूप मोठं योगदान दिलं आहे.
कलेचं लौकिक शिक्षण घेतलं - फडणीस यांचा जन्म 29 जुलै 1925 रोजी बेळगाव जिल्ह्यातील भोज या गावात झाला. नंतर ते कोल्हापुरात आले आणि मॅट्रिक झाले. त्यानंतर त्यांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला आणि व्यावसायिक कलेमध्ये जी डी आर्ट हा कोर्स केला. जे.जे. मध्ये शिकत असताना त्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता १९४५ मध्ये मनोहर मासिकाला व्यंगचित्रे पाठवली. ती प्रकाशित झाली आणि त्यातून त्यांना प्रेरणा मिळाली. त्यामुळे ते अधूनमधून या लोकप्रिय मासिकाला कॉमिक स्ट्रिप्स पाठवत असत.
नियतकालिक जगताला हास्यचित्रांची देण - त्या काळात प्रसिद्ध नियतकालिकांपैकी एक ‘हंस’ हे नियतकालिक अनंत अंतरकर चालवत होते. 1950 मध्ये अंतरकर यांनी मोहिनी नावाचं दुसरं मासिक काढलं. हा तो काळ होता जेव्हा विशेष दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठांवर परंपरेनुसार सुंदर महिला किंवा लोकप्रिय चित्रपट अभिनेत्रींचाच वावर असायचा. मात्र 1952 मध्ये, दिवाळीतील अंकाच्या मुखपृष्ठावर माऊस प्रिंटचा शर्ट घातलेला एक माणूस आणि कॅट प्रिंटची साडी घातलेली महिला बस स्टॉपवर शेजारी-शेजारी उभी असल्याचे दाखवलेले व्यंगचित्र छापण्यात आले होते. शि. द. फडणीस यांचे हे चित्र कमाल करुन गेले. त्याला वाचकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. त्या काळात हा एक नवीन ट्रेंडच उदयाला आला. राज्यातील व्यंगचित्रकला विकासाची ही सुरुवात होती. या नंतरच्या काळात फडणीस यांनी राजकीय आणि सामाजिक व्यंगचित्रे काढली. विनोद, विज्ञान, व्याकरण, तत्त्वज्ञान अशा विषयांवरील पुस्तके आणि इतरही विविध विषयांसाठी त्यांनी व्यंगचित्रे काढली. त्यांची शैली ही अलंकारिक रेखाटन शैली होती. त्यांच्या व्यंगचित्रातली पात्रे साध्या आणि सुसंस्कृत लोकांचे चित्रण करतात जी एकमेकांची चेष्टा करतात आणि करमणुकीने जगाच्या समस्या दाखवून देतात. एका अर्थानं ते वर्मावर बोट ठेवतात. त्यांच्या व्यंग चित्रामध्ये कधीच क्लिष्टता नव्हती, ती खूप साधी होती, मात्र अत्यंत अर्थवाही होती. त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबाच्या जीवनात घडणाऱ्या घटनांचं चित्रण होतं. ही व्यंगचित्रं जरी असली तरी त्यामध्ये एखाद्या अप्रतिम पेंटिंगसारखी मोहकता होती.