वॉशिंग्टनUS Presidential Elections :अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन तसंच माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात मुख्य लढत होणार आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प तसंच डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यात राष्ट्राध्यक्षपदासाठीची पहिली वादविवाद-चर्चा झाली. मात्र, या वादात जो बायडेन यांची कामगिरी निराशाजनक झाल्याची चर्चा आहे. त्यामागं त्यांचं वाढलेलं वय हे प्रमुख कारण असल्याचा आरोप होतोय. अध्यक्ष जो बायडेन बोलत असताना अनेकदा अडखळले. अध्यक्षीय चर्चेत मुद्दे मांडण्यात ते अयशस्वी ठरल्यानंतर, डेमोक्रॅटिक पक्षात त्यांची उमेदवारी नाकारण्याच्या तसंच नवीन उमेदवार उभा करण्याच्या मागणीनं जोर धरला आहे. निवडणुकीपूर्वी बायडेन यांच्याच पक्षाचे खासदार त्यांना अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून नाव मागे घेण्याचा आग्रह करत आहेत. हाऊस डेमोक्रॅटिक खासदार लॉयड डॉगेट यांनी जाहीरपणे अध्यक्ष जो बायडेन यांना उमेदवारी मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे, की जो बायडेन यांनी त्यांचं नाव मागं घेण्याचा निर्णय घेतला पाहिजे.
बायडेन यांच्यावर प्रश्न उपस्थित :अमेरिकेत गेल्या आठवड्यात झालेल्या प्रेसिडेंशियल डिबेटनंतर, जो बायडेन यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची उमेदवारी सोडावी, अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबत टेक्सास प्रांताचे प्रतिनिधी लॉयड डॉगेट हे सार्वजनिकपणे अशी मागणी करणारे पहिले नेते आहेत. याबात बर्नी सँडर्स यांनी अध्यक्ष जो बायडेन यांच्या कामगिरीचं वर्णन “वेदनादायक” असं केलंय. एका मुलाखतीत, ते म्हणतात की 'बायडेन पुन्हा जिंकतील असं माला वाटत नाही'. "अध्यक्षपदाची निवडणूक ही ग्रॅमी पुरस्काराची स्पर्धा नाही. आमच्या जीवनावर परिणाम करणारी सर्वोत्तम धोरणे कोणाची आहेत याबद्दल निवडणूक आहे". प्रेसिडेंशियल डिबेटनंतर, डेमोक्रॅटिक पक्षात बायडेनविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात झाली आहे. त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना या निवडणुकीत बायडेन विजय मिळवून देऊ शकत नाहीत, असं वाटतंय.
बायडेन समर्थकांमध्ये घबराट :अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बायडेन यांच्या खराब कामगिरीमुळं त्यांच्या समर्थकांमध्ये घबराट निर्माण झाली. याबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केलाय. 81 वर्षीय बायडेन रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार ट्रम्प यांच्याशी लढणारे सर्वात मजबूत डेमोक्रॅटिक उमेदवार आहेत का? असा प्रश्न त्यांच्या पक्षाचे उमेदवार उपस्थित करत आहेत. माजी सभागृह अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांनी मंगळवारी विधान केल्यानंतर लॉयड डॉगेट यांनी उघडपणे जो बायडेन यांच्या उमेदवारीला विरोध केलाय. नॅन्सी पेलोसी म्हणाल्या की, गेल्या आठवड्यात झालेल्या चर्चेनंतर अध्यक्ष बायडेन यांच्याशी बोलणं झालेलं नाही. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गेविन न्यूजम, मिशिगन गव्हर्नर ग्रेचेन व्हिटमर तसंच उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्यासह अनेक नेते बायडेनबाबत चर्चा करताय.
बायडेन समर्थक कार्यकर्त्यांकडून हल्ला :अशावेळी बायडेन यांच्या राजकीय युतीमधील प्रमुख गट एकमेकांच्या विरोधात जाऊ लागले आहेत. एकेकाळी रिपब्लिकन राजकीय मोहिमेसाठी काम करणारे समर्थक टिम मिलर यांच्यावर अलीकडच्या काही दिवसांत बायडेन समर्थक कार्यकर्त्यांकडून हल्ला झाला आहे. बायडेन यांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या संभाव्यतेबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर त्याच्या कुटुंबाची छायाचित्रे पोस्ट केली होती. त्यातून त्यांच्यावर हल्ला झाला होता. एका मुलाखतीत, मिलर म्हणाले, निवडून आलेले डेमोक्रॅट त्यांची चिंता मला सांगतायत. पुढचा मार्ग काय आहे याबद्दल चर्चा करण्याची ही योग्य वेळ आहे. अन्यथा, दुसऱ्यांदा डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत, ते पुढे जातील.