महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानं अनेकांना आश्चर्यचकित केलं. लोकशाहीत सुशासनासाठी प्रबळ विरोधी पक्ष महत्त्वाचा असतो. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षांना विरोधी पक्षनेतेपद मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या निकालापूर्वी मुख्यमंत्रिपदावर दावा केला जात होता. शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन भांडण सुरु झालं होतं. परंतु, आता त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड झालं आहे.
राज्यातील विधानसभेच्या 288 जागांपैकी महायुतीला 230 जागा मिळाल्या. यात भाजपाला 132 जागा, शिवसेनेला 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या. तर महाविकास आघाडीला एकूण 46 जागा मिळाल्या. काँग्रेसला 16, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 20 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (शरदचंद्र पवार) 10 जागा जिंकता आल्या आहेत. तर अपक्ष-इतर यांना 12 जागा मिळाल्या आहेत. महाविकास आघाडीतील एकाही पक्षाला विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असणारा आकडा गाठता आला नाही. विरोधी पक्षनेतेपद लोकशाहीत महत्त्वाचं असतं. विधिमंडळात या पदाला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतो. विरोधी पक्षनेत्याला सरकारच्या धोरणांवर जाब विचारण्याचा अधिकार असतो.
अंतर्गत वादामुळं भाजपाला फायदा : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं तब्बल 30 जागा जिंकल्या. सत्ताधारी महायुतीला केवळ 17 जागा मिळवता आल्या होत्या. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्तापरिवर्तन होणार असल्याची चर्चा होती. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीला यश मिळेल, अशी आशा महाविकास आघाडीच्या नेत्यांना होती. मात्र, पक्षांमधील अंतर्गत वादामुळं भाजपासाठी मैदान मोकळं झालं. विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहता महाविकास आघाडीला चांगलाच फटका बसला. त्यासोबतच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेलाही धोका निर्माण झालाय. कारण, विधानसभा निवडणुकीत भाजपानं 132 जागा जिंकल्या आहेत. या जागा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेपेक्षा जास्त आहेत.