महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / opinion

‘सर्वांसाठी घरे’ आणि भारतीय शहरांमधील भाड्याच्या घरांचा प्रश्न - Dream of Housing for All - DREAM OF HOUSING FOR ALL

Dream of Housing for All - प्रत्येकाचं आपलं एक घर असावं असं स्वप्न असतं. सरकारनं त्यासाठी विविध योजना राबवल्यात PMAY - U ही योजना शहरी भागासाठी राबवण्यात आली. मात्र अनेक लोकांना ही घरं परवडत नसल्याचं दिसून येत. यासंदर्भात एकूणच गृहनिर्माण धोरणा यासंदर्भात सौम्यदीप चटोपाध्याय, असोसिएट प्रोफेसर, अर्थशास्त्र आणि राजकारण विभाग, विश्वभारती (केंद्रीय विद्यापीठ) शांतिनिकेतन पश्चिम बंगाल यांचा हा लेख...

सर्वात मोठा गृहनिर्माण प्रकल्प
सर्वात मोठा गृहनिर्माण प्रकल्प (ईटीव्ही भारत, संग्रहित चित्र)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 21, 2024, 7:09 PM IST

Updated : Jun 22, 2024, 11:52 AM IST

हैदराबाद Dream of Housing for All: नवनिर्वाचित NDA सरकारनं आपल्या पहिल्या बैठकीत भारतातील ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांमध्ये 30 दशलक्ष अतिरिक्त घरे बांधण्याचा निर्णय घेतलाय. अर्थमंत्र्यांनी या वर्षीच्या अंतरिम अर्थसंकल्पात पुढील पाच वर्षांत ग्रामीण भागासाठी अतिरिक्त 20 दशलक्ष घरं बांधण्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे शहरी भागात 10 दशलक्ष अतिरिक्त घरं मिळण्याची अपेक्षा आहे. 2018 मध्ये 29 दशलक्ष शहरी घरांच्या तुटवड्यापेक्षा हा आकडा कमी आहे. याचा अंदाज इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स (ICRIER) अहवाल 2020 मध्ये वर्तवला होता.

शहरातील घरांची समस्या - 10 जून 2024 पर्यंत, PMAY या शहरी घरांसाठी प्रमुख केंद्रीय योजनेंतर्गत, सुमारे 11.86 दशलक्ष घरे मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी 11.43 दशलक्ष घरांचं धकाम सुरू झालं आहे आणि 8.37 दशलक्ष घरं पूर्ण झाली आहेत. त्यामुळे, घरांची टंचाई ही शहरांमध्ये एक गंभीर धोरणात्मक चिंता आहे. ICRIER अहवाल (2020) ने सूचित केलं आहे की, घरांच्या टंचाईचा सामना करत असलेले 99 टक्के शहरी रहिवासी हे कमी उत्पन्न गटातील आहेत. गृहनिर्माण बाजारपेठेतील त्यांचा प्रवेश मर्यादित पत आणि परवडत नसल्यामुळे होत नाही. कारण ते मुख्यतः स्वयंरोजगार आहेत किंवा इतर असंघटित क्षेत्रासारख्या उद्योगात आहेत.

अधिकृत गृहनिर्माण धोरणे - सध्याच्या PMAY-U सह भारतातील अधिकृत गृहनिर्माण धोरणांमध्ये 'सर्वांसाठी घरे' आणि सर्व रहिवाशांना घरांची मालकी देणे यासाठी कटीबद्ध आहे. PMAY-U ने 2022 पर्यंत सर्वांसाठी घरांचा एक भाग म्हणून केवळ भाड्याने देण्यासाठी बांधल्या जाणाऱ्या वीस दशलक्ष घरांपैकी 20 टक्के घरे निश्चित करण्याचा विचार केला. त्यानंतर वित्त समितीने PMAY-U मधील भाड्याच्या घटकासाठी 6,000 कोटी रुपयांचा खर्च मंजूर केला. तथापि, PMAY-U योजना शेवटी 2015 च्या उत्तरार्धात सादर करण्यात आली. मालकीच्या घरांच्या तरतुदींसह यात चार प्रकार करण्यात आले. त्यामध्ये झोपडपट्टीचा पुनर्विकास, सरकारकडून घरे खरेदी करण्यासाठी व्याजदर अनुदान मिळण्याच्या तरतुदीसह क्रेडिट-लिंक्ड सबसिडी योजना, विकासकांसाठी सबसिडीच्या तरतुदीसह भागीदारीत परवडणारी घरे आणि लाभार्थ्यांच्या नेतृत्वाखालील घर बांधणी किंवा वाढीसाठी आर्थिक सहाय्य यांचा समावेश होता. व्यावहारिकदृष्ट्या, जमिनीच्या मालकीच्या कायदेशीर आणि प्रशासकीय अडचणी, गृहनिर्माण खर्चाशी जुळण्यासाठी व्याजदर अनुदानाचा अपुरेपणा, घरांचे असुविधाजनक स्थान या समस्या होत्या. त्याचबरोबर खासगी क्षेत्राचा कमी प्रतिसाद, यामुळे शहरी घरांच्या टंचाईचं निराकरण करण्यात योजनेच्या परिणामकारकतेवर परिणाम झाला.

प्रातिनिधीक घराचे चित्र (संग्रहित चित्र)

भाड्याच्या घरांचा मुद्दा - PMAY-U योजनेमध्ये भाड्याच्या घरांना स्थानच नाही. त्यामुळे भारतीय शहरी कुटुंबांच्या घरांच्या गरजेतील विरोधाभास यातून दिसतो. घर विकत घेण्यापेक्षा भाड्याने घेण्याला कमी उत्पन्न गटातील लोक प्राधान्य देतात. 2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार, 27.5 टक्के शहरी कुटुंबे भाड्याच्या घरात राहतात आणि 2001 ते 2011 दरम्यान, भाड्याच्या घरात राहणाऱ्या शहरी कुटुंबांची संख्या 6.4 दशलक्षने वाढली आहे. विशेष म्हणजे, याच कालावधीत शहरी भागात 4.6 दशलक्ष रिकाम्या घरांची वाढ नोंदवली गेली. यातून भाड्याच्या घरांच्या आणि रिकाम्या घरांच्या मागणीचं सत्य दिसून येतं. एनएसएसओच्या 2018 च्या अहवालात म्हटलय की भारतातील सर्व शहरी कुटुंबांपैकी एक तृतीयांश लोक भाड्याच्या घरात राहतात. तसंच दहालाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये हेच जास्त प्रमाणात दिसून येतं. सुमारे ७० टक्के भाडेकरूंचे घरमालकाशी कोणतेही करार नाहीत आणि त्यांचे सरासरी मासिक भाडे 3150 रुपये आहे. घरमालक आणि भाडेकरू हे प्रमाणित भाड्यांपेक्षा जास्त भाड्यांबाबत परस्पर सहमती दर्शवतात. मालकीच्या घरांपेक्षा भाड्याने घर घेतलेल्या कुटुंबांना वैयक्तिक शौचालय आणि पाणीपुरवठ्यासाठी अडचणी येतात. दहालाखांहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरात राहणाऱ्या भाडेकरूंनाही मुलभूत सेवांचा अधिक चांगला लाभ मिळत नाही. शिवाय, भाड्याच्या घरात राहणाऱ्या शहरी कुटुंबांचे प्रमाण वाढताना दिसते. यातूनच भाड्याने घर घेणाऱ्यांचा वाटा अधिक असल्याचं स्पष्ट होते.

मालकीसाठी घरांची निर्मिती, भाड्याने देण्याच्या घरांच्या निर्मितीमधील कमतरता, तसंच भाडेपट्टीसंदर्भातील कायदे यातून घरांच्या पुरवठ्यामध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. भाड्यातून मिळणारे कमी उत्पन्न ही एक गंभीर समस्या आहे. कारण IDFC 2018 अहवालानुसार भारतीय शहरांमध्ये निवासी भाड्याने मिळणारे उत्पन्न 2% ते 4% दरम्यान आहे. त्याचवेळी भाडेकरुंच्या तंट्यामुळे होणारे वाद हे वेळखाऊ असतात. यामुळे घरमालकांना भाड्याने घरे देण्यासाठी अखडता हात घ्यावा लागतो. त्यामुळे घरमालक देखरेख सुधारणा तसंच घराच्या विस्ताराचा प्रयत्न जवळजवळ करतच नाहीत. यातून पुरेशी घरे भाड्याने देण्यास उपलब्ध होत नसल्यानं भाडे वाढ होते. यातून शहरी गरिबांना भाड्याची घरे परवडत नाहीत.

भाड्याच्या घरांच्या समस्यांच्या निराकरणासाठी भाडेतत्त्वावरील घरांच्यासाठी 2021 मध्ये मॉडेल टेनन्सी कायदा (MTA) लागू करण्यात आला. यामध्ये अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ, सिक्युरिटी डिपॉझिटची कमाल दोन महिन्यांच्या भाड्यापर्यंत मर्यादा, वेळेवर जागा रिकामी करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल भाडेकरूला मोठा दंड, पुरेशा कारणाशिवाय आणि नोटीस न देता मनमानीपणे भाडेवाढीवर घरमालकांवर निर्बंध, घरमालक आणि भाडेकरू या दोघांच्या हितसंबंध आणि संघर्षांचा समतोल साधत हा कायदा करण्यात आल्याचं दिसतं. भाडे न्यायालये आणि भाडे न्यायाधिकरणांची स्थापना करून भाड्याने घेतलेल्या घरांचे विवाद त्वरीत सोडवण्यासाठी तरतूद केल्यास भाडे कराराची प्रभावी अंमलबजावणी निश्चित करता येईल. तरीसुद्धा, केवळ चार राज्यांनी, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि आसाम यांनी MTA 2021 च्या धर्तीवर त्यांच्या भाडेकरार कायद्यात सुधारणा केली आहे. याव्यतिरिक्त, भाडे कराराच्या कायदेशीर बाबींच्यामध्ये अल्पसंख्यकांच्या हिताचाही समावेश करण्यात आला आहे.

समस्येवर उपाय काय - देशाचं शहरीकरण झपाट्यानं होत असल्यानं लाखो लोक शहरांमध्ये जात आहेत. त्यामुळे भविष्यात घरांची मागणी वाढतच जाईल. या मागण्या पूर्ण करण्यासाठी भाड्याच्या घरांच्या मागणीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. यामुळे PMAY-U अंतर्गत भाड्याने घर घेणाऱ्यांच्यासाठी धोरणात योग्य बदल करणं गरजेचं आहे. भाड्याने देण्याच्या पद्धती व्यावसायिकरित्या व्यवस्थापित करण्यासाठी भाडे व्यवस्थापन समित्यांना धोरणात समाविष्ट करण्याच्या शक्यतांचा वेध घेतला पाहिजे. असुरक्षित वर्गांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी योग्य सुधारणांसह MTA ची अंमलबजावणी जलदगतीने करणे तितकेच महत्त्वाचे आहे. यामुळे गृहनिर्माण बाजारपेठ सर्वसमावेशक होईल आणि ‘सर्वांसाठी घरे’ हे स्वप्न साकार करण्यास मदत होईल.

हेही वाचा...

पारदर्शकता हेच भ्रष्टाचार रोखण्याचं उत्तम साधन, भारतीय माहिती अधिकार कायद्याचं गमक

Last Updated : Jun 22, 2024, 11:52 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details