मुंबई - हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणावरील झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. यासोबतच विरोधकांनी उपस्थित केलेल्या ईव्हीएम पासून राज्यातील विकासाच्या प्रत्येक प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिलं.
५ वर्षापासून देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात बोलताना विधानसभेत मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल राज्यातील जनतेचे तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही आभार मानले. काही लोक उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कायमस्वरूपी उपमुख्यमंत्री म्हणतात. परंतु अजित पवार एक दिवस मुख्यमंत्री होतील. त्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. विरोधकांनी मागील पाच वर्षापासून देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं आहे. या मुद्द्यावर बोलताना फडणवीस यांनी शेरोशायरी म्हणत विरोधकांना उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, आंधीयो मे भी जो जलता हुआ मिल जायेगा, उस दिए से पूछना, मेरा पता मिल जायेगा. तसंच ज्या काही योजना राज्यात महायुती सरकारने सुरू केल्या आहेत त्या कदापि बंद पडणार नाहीत. लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता अधिवेशन संपल्याबरोबर टाकत आहोत. अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी केली.
कर्नाटक हे काही छोटे राज्य नाही - विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी झालेल्या दारुण पराभवानंतर याचं खापर ईव्हीएम मशीनवर फोडलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या या आरोपाचाही भरपूर समाचार घेतला. फडणवीस म्हणाले की, शरद पवार आतापर्यंत ईव्हीएमवर कधीच बोलले नव्हते. परंतु आता ते जे काही बोलले त्याचं मला आश्चर्य वाटतं. मारकवाडीमध्ये फेक नरेटीव्ह केलं जातं आहे. पवार साहेब असं म्हणाले की, ईव्हीएमचं सेटिंग असं झालं आहे की छोटी राज्यं हे जिंकतात आणि मोठी राज्य आम्ही जिंकतो, याचं मला नवल वाटलं. कर्नाटक हे काही छोटं राज्य नाही. फारुख अब्दुल्ला आणि ममता बॅनर्जी यांनीही ईव्हीएमवर दोषारोप करणं सोडून द्या असं सांगितलं आहे.
दादागिरी खपवून घेतली जाणार नाही - बॅलेट पेपरच्या मुद्द्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, मारकडवाडीमध्ये लोकांना धमकावून बॅलेट पेपरवर वोटिंग करायला सांगितलं जात आहे. परंतु लोकशाहीमध्ये दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. २०१२ नंतर व्हीव्हीपॅटवर मतदान सुरू आहे. व्हीव्हीपॅट म्हणजे एकप्रकारे बॅलेट पेपरचं असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. निकाल आपल्या बाजूने लागला तर जनतेचा कौल, लोकशाहीचा विजय. परंतु निकाल आपल्या विरोधात लागला तर ईव्हीएम वर दोषारोप. एक प्रकारे संविधानावर दाखवलेला हा अविश्वास आहे. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा ईव्हीएमचा पूर्ण वापर झाला. तेव्हा मनमोहन सिंग यांचं सरकार आलं. २००९ मध्ये सुद्धा ईव्हीएमचा वापर झाला. पुन्हा मनमोहन सिंग यांचं सरकार आलं. पण २०१४ मध्ये मोदीजींचं सरकार आल्यानंतर ईव्हीएम वाईट. निवडणूक आयोगाने सर्वच राजकीय पक्षांना ८ दिवसाचा अवधी दिला होता. जर तुम्हाला शंका असेल तर तुम्ही ईव्हीएम मध्ये छेडछाड होऊ शकते हे करून दाखवा, असं सांगितलं होतं. पण कुठल्याही पक्षाचा एकही नेता पुढे आला नाही. माझं तुम्हाला आवाहन आहे खुल्या दिलाने पराभव स्वीकारा. जोपर्यंत तुम्ही आत्मपरीक्षण करणार नाहीत तोपर्यंत अशीच परिस्थिती राहील. लोकसभेत आम्ही आमचा पराभव मान्य केला. आम्ही सांगितलं फेक नरेटीव्हमुळे आमचा पराभव झाला. आता त्याला आम्ही विधानसभा निवडणुकीत त्याच पद्धतीनं उत्तर दिलं आहे. इथेही मुख्यमंत्र्यांनी शेरोशायरी करत विरोधकांना टोला लगावला आहे.
फडणवीस म्हणाले, गालिब, ताउम्र यह भूल करता रहा, धुल चेहरे पर थी और आयना साफ करता रहा... अनेक देशांना भारतात अराजकता पसरवायची आहे. त्याकरता ते कोणाचा तरी खांदा शोधत आहेत. मी हात जोडून विनंती करतो की, अशा लोकांना तुमचा खांदा देऊ नका. निवडणूक जिंकण्याकरता देशात व्होट जिहादचा नारा दिला गेला. १७ मागण्या मांडल्या गेल्या. मालेगाव मध्ये २०२४ मध्ये ११४ कोटीची बेनामी रक्कम खात्यात आल्याची तक्रार प्राप्त झाली. सिराज मोहम्मद याने १४ बँक खाती नाशिक मर्चंट बँकेत उघडली. त्यात ११४ कोटी जमा झाले होते. २१ लोकांच्या खात्यात ते फिरवले गेले. नंतर असं लक्षात आले की, ३१ राज्यातून २०० पेक्षा अधिक खात्यात हजारो कोटींचा व्यवहार झाला आहे. यातील ६०० कोटी दुबईला पाठवण्यात आले आहेत. यातील १०० कोटी रुपये या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या गोष्टीसाठी वापरण्यात आले. दहशतवादी फंडिंग म्हणून एटीएसकडे हा तपास गेला आहे. परंतु निवडणुका जिंकण्याकरता आपण कुठल्या स्तराला चाललो आहोत. या देशाच्या निवडणुकीत एक परकीय हस्तक्षेप सुरू झालेला आहे, याचे पुरावे देशाच्या संसदेमध्ये आलेले आहेत. तुमच्या देशभक्तीवर माझी शंका नाही. परंतु दुर्दैवाने आमच्या विरोधात आपला खांदा कोणालातरी बंदूक ठेवायला देतय याचं मला दुःख आहे. आपल्या खांद्यावर कोण बंदूक ठेवतो याचा कधीतरी विचार केला पाहिजे.
महाराष्ट्रच नंबर वन - आम्ही छत्रपतींच्या विचाराचे वारसदार आहोत. आपले विरोधकच गुजरात चांगला कसा आहे, त्याचा प्रचार करत आहेत. पण महाराष्ट्र कालही नंबर एक होता. आजही आहे. उद्याही राहील. देशात आज १० राज्य स्पर्धा करत आहेत. देशाचा विकास करायचा असेल तर फक्त महाराष्ट्राच्या विकासाने देशाचा विकास होत नाही. परंतु इतर राज्यांना मागे टाकून माझा महाराष्ट्र पुढे कसा राहीला याचा प्रयत्न आपल्याला करावाच लागेल. विदर्भात ४७ मोठे प्रकल्प येत आहेत. त्यामध्ये १ लाख २३ हजार ९३१ कोटी इतकी गुंतवणूक असून ६१ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. मराठवाड्यात ३८ प्रकल्प येत असून त्यामध्ये ७४ हजार ६४३ कोटीची गुंतवणूक होत असून ४१ हजार ३३५ रोजगार निर्मिती होणार आहे. उर्वरित महाराष्ट्रात १३६ प्रकल्प येत असून ज्यामध्ये १ लाख ४९ हजार ४९३ कोटीची गुंतवणूक आणि १ लाख १० हजार ५८८ इतके रोजगार तयार होणार आहेत. एफडीआयमध्ये आपण नंबर एकवर आहोत. देशातील ३१ टक्के गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रात आहे. टोयोटोचा नवीन प्रकल्प महाराष्ट्रात येत आहे. आमची भूमिका झिरो टॉलरन्स असणार आहे.
दुष्काळ मुक्त महाराष्ट्रासाठी - मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, आम्ही महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प हाती घेतला आहे. नदीजोड प्रकल्प हा त्यावरील मोठा उपाय आहे. परंतु हे प्रकल्प होत नाहीत कारण अनेक राज्यांबरोबर वाद आहेत. मुंबई मेट्रो तीनचं काम अंतिम टप्प्यात आहे. बीकेसी ते कुलाबा मेट्रोचा मार्ग मे २०२५ पर्यंत खुला होणार. वसुलीबाजांना थारा देणार नाही हे आमच्या सरकारचं धोरण आहे. २०२६ पर्यंत १६ हजार मेगावॉट विजेची काम पूर्ण करणार. शेतकऱ्यांकडून पुढच्या ५ वर्षात विजेचे बिल घेतलं जाणार नाही. हा आमचा निर्धार कायम आहे. मागेल त्याला सौर पंप दिला जाणार आणि तीन महिन्यात कनेक्शन करणार असंही मुख्यमंत्री म्हणाले.