वॉशिंग्टन- अमेरिकेतील जॉर्जिया राज्यातील एका हायस्कूलमध्ये बुधवारी झालेल्या गोळीबारात चार जण ठार झाले. तर काही जण जखमी झाले आहेत. अमेरिकेतील माध्यमाच्या माहितीनुसार पोलिसांनी कथित हल्लेखोराला ताब्यात घेतलं आहे.
अमेरिकेतील जॉर्जिया येथील हायस्कूलमध्ये एका विद्यार्थ्यानं थेट वर्गात गोळीबार केल्यानं दोन विद्यार्थ्यांसह चार जण ठार झाले. तर नऊ जण जखमी झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोळी झाडणारा हल्लेखोर विद्यार्थी हल्ल्यापूर्वी वर्गात शांत बसला होता. वर्गात अचानक गोळीबार सुरू होताच वर्गातील इतर विद्यार्थ्यांनी डेस्कच्या मागे लपून आपले प्राण वाचविले. एकामागून एक गोळ्यांच्या अनेक राऊंडचे आवाज सुरू असताना अनेकजण जमिनीवर पडून राहिले. गोळीबाराच्या आवाजानंतर एका शिक्षकानं शाळेतील लाईट बंद केली.
पालकवर्गाच चिंतेचं वातावरण -शाळा हे सर्वात सुरक्षित आणि विद्यार्थ्यांना घडविण्याचं ठिकाण मानलं जाते. मात्र, अमेरिकेत सातत्यानं शाळांमध्ये गोळीबाराच्या घटना घडतात. विशेष म्हणजे असे गोळीबार हे विद्यार्थ्यांकडून केले जातात. अमेरिकेत बंदुकीचे परवाने सर्रास दिले जात असल्यानं घरोघरी बंदुकी असतात. विद्यार्थ्यानं गोळीबार का केला, याची माहिती अद्याप समोर आलं नाही. विद्यार्थ्यानं शाळेत गोळीबार का केला? विद्यार्थ्याला शाळेत गोळीबार करण्याकरिता कुणी प्रवृत्त केले होते का? याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. शाळेतील गोळीबाराच्या घटनेनंतर अमेरिकेतील पालकवर्गात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
- अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनीही एक्स मीडियावर पोस्ट करत गोळीबारामुळे मृत्यू झालेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला. देशातील बंदुकीच्या हिंसाचाराची महामारी कायमची संपवली पाहिजे, असे त्यांनी मत व्यक्त केले.
बंदूक परवान्याच्या नियमावर जोय बायडेन यांची टीका-बॅरो काउंटी शेरीफ जड स्मिथ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, " तुम्ही आमच्या मागे जे पाहत आहात, ती एक वाईट गोष्ट आहे. गोळीबारात काही जण जखमी झाले आहेत" यापेक्षा जास्त त्यांनी माहिती सांगितली नाही. जो बायडेन यांनी शाळेतील गोळीबाराच्या घटनेनंतर बंदूक परवाना देणाऱ्या कायद्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन म्हणाले, " बंदुकीच्या हिंसाचारात मृत्यू झालेल्या व्यक्तींबद्दल मी शोक व्यक्त करतो. जॉर्जियाच्या विंडरमध्ये आनंदोत्सव साजरा करण्याऐवजी आपल्यासाठी आणखी एक भयानक आठवण ठरली आहे. बंदुकीच्या हिंसाचारामुळे समाज उद्धवस्त होत आहे. हिंसाचाराची महामारी संपविणं अत्यंत महत्त्वाचं आहे." मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेत चालू वर्षात सार्वजनिक ठिकाणी किमान 385 गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत