सेऊल : साऊथ कोरियात विघातक कार्य करणाऱ्या शक्तींना अटकाव करण्यासाठी आणीबाणी आणि मार्शल लॉ लागू करण्यात आला होता. मात्र दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांनी बुधवारी पहाटे आणीबाणीसह मार्शल लॉ हटवण्याची घोषणा केली. साऊथ कोरियाच्या नॅशनल असेंब्लीनं मार्शल लॉ संपुष्टात आणण्यासाठी केलेल्या मतदानानंतर हा निर्णय घेण्यात आला, असं वृत्त एजन्सीनं दिलं आहे. दरम्यान मार्शल लॉ उठवण्यात आला असला, तरी विरोधकांनी राष्ट्राध्यक्षांवर टीका केली आहे.
मार्शल लॉ हटवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी :मंगळवारी मध्यरात्री राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळानं मार्शल लॉ हटवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. साऊथ कोरियात मार्शल लॉ लागू करण्यात आल्यानं आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी चिंता व्यक्त करण्यात येत होती. विरोधकांनी देशविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत साऊथ कोरियात मार्शल लॉ लागू करण्यात आला. विरोधकांकडून देशाला पंगू करण्याचं कारस्थान रचण्यात येत होतं. त्यामुळे देशविरोधी कारवायांना अटकाव करण्यासाठी ही कृती गरजेची होती, असा दावा सरकारकडून करण्यात येत आहे.
मार्शल लॉ उठवल्यानंतरही विरोधकांची राष्ट्राध्यक्षांवर टीका :दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफनं मार्शल लॉ लागू करण्यासाठी तैनात केलेलं सैन्य त्यांच्या तळांवर परतलं आहे, याबाबतच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सैन्य परत आणल्यामुळे परिस्थिती सामान्य होण्याचे संकेत मिळाले आहेत. "देशविघातक कारवाया रोखण्यासाठी देशात मार्शल लॉ लागू करण्यात आला होता. मात्र नॅशनल असेंब्लीनं मार्शल लॉ रद्द करण्याची मागणी केल्यानंतर सैन्य मागे घेतलं. काल रात्री 11 वाजता मी देशातील लोकशाही पंगू करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींपासून देशाला वाचवण्यासाठी आणीबाणी मार्शल लॉ जाहीर केला. परंतु मार्शल लॉ उठवण्याची मागणी नॅशनल असेंब्लीकडून करण्यात आली. त्यामुळे मार्शल लॉ अंमलात आणण्यासाठी एकत्रित केलेलं सैन्य मागे घेतले आहे," असं राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांनी स्पष्ट केलं. मात्र मार्शल लॉ उठवल्यानंतरही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राष्ट्राध्यक्ष यूनवर टीका केली. काही नेत्यांनी त्यांच्याविरुद्ध महाभियोगाची कार्यवाही सुरू करण्याची धमकी दिली, असं वृत्तही वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
हेही वाचा :
- बोगस कागदपत्रांआड गरजू युवकांना दक्षिण कोरियात नोकरीसाठी पाठवायचा; 'या' कारणानं सत्य आलं उजेडात - South Korea Job Scam
- दक्षिण कोरिया जॉब रॅकेट प्रकरणात टेरर अँगलची शक्यता, नौदलातील अधिकारी शर्मा आणि आरोपी डागरा जम्मू काश्मीरमधील शाळेतले वर्गमित्र - South Korea job racket
- दक्षिण कोरियात लिथियम कारखान्यात भीषण आग; 22 कामगारांचा होरपळून मृत्यू - Fire in Lithium Battery Factory