इस्लामाबाद (पाकिस्तान) - राजकीय अस्थिरता आणि आर्थिक दिवाळखोऱ्यात असलेल्या पाकिस्ताननं अखेर कारगिलच्या घुसखोरीबाबत चूक कबूल केली. पीएमएल-एनच्या सर्वसाधारण सभेच्या बैठकीदरम्यान शरीफ यांनी कारगिल युद्ध अणुचाचणीबाबत वक्तव्य केलं.
पनामा पेपर्समध्ये त्यांचे नाव आल्यानंतर नवाज शरीफ यांना पीएमएल-एनचे अध्यक्षपद गमवावं लागलं होतं. नवाज शरीफ पक्षाच्या बैठकीत म्हणाले, "२८ मे १९९८ रोजी पाकिस्ताननं पाच अणू चाचण्या केल्या होत्या. त्यानंतर वाजपेयी साहेब ( माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी) हे येथे ( पाकिस्तान) आले. त्यांनी आमच्याबरोबर करार केला. मात्र, आम्ही त्या कराराचा भंग केला. ती आमची चूक होती."
सैन्यदलासह इम्रान खानवर निशाणा-पुढे नवाज शरीफ म्हणाले, " अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी अणुचाचणी थांबविण्यासाठी पाकिस्तानला ५ अब्ज डॉलर देण्याची तयारी दर्शवली होती. जर माझ्याजागी इम्रान खान असते तर त्यांनी ती ऑफर स्वीकारली असती. पाकिस्तानच्या अणुचाचणीला २६ वर्ष पूर्ण होण्याच्या पूर्वसंध्येला शरीफ यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. आयएसआयचे प्रमुख जनरल झहीरुल इस्लाम यांनी २०१७ मध्ये सरकार कोसळत असताना दुर्लक्ष केलं. त्याचाच परिणाम म्हणून इम्रान खान यांची सत्ता आली. सैन्यदलाला मदत करत असल्यालाबद्दत इम्रान खान यांनी आम्हाला दोष देऊ नये. जनरल इस्लाम यांनी पीटीआयला ( इम्रान खानचा पक्ष) सत्तेत येण्यासाठी मदत केली का? हे त्यांनी सांगावं. सैन्यदलाच्याच्या पायाजवळ इम्रान खान बसतील, असा टोलाही त्यांनी लगावला. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश साकीब निसार यांनी चुकीच्या प्रकरणात पंतप्रधान कार्यालयातून मला काढले होते," असा आरोप पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांनी केला.
काय होता भारत-पाकिस्तानमधील करार?भारत-पाकिस्तानमध्ये 'लाहौर घोषणा' हा करार झाला होता. या करारावर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी २१ फेब्रुवारी १९९९ मध्ये हस्ताक्षर केले होते. त्या करारानंतर दोन्ही शेजारील देशांमध्ये शांतता आणि स्थैर्य राहावे, हा हेतू होता. मात्र, प्रत्यक्षात काही काळानंतर पाकिस्तानच्या घुसखोरांनी जम्मू काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यातून घुसखोरी केली. त्याचाच परिणाम म्हणून कारगिल युद्ध घडलं.