तेल अवीव-हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसराल्लाहला ठार केल्यानंतरही इस्रायलकडून पुन्हा एकदा लेबेनॉनमधील दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात हिजबुल्लाह कमांडर नबील कौक ठार झाल्याचा दावा इस्रायलच्या सुरक्षा दलाकडून करण्यात आला. कौक हा हिजबुल्लाहच्या प्रमुख नेत्यांच्या जवळचा कमांडर होता. दुसरीकडं इस्रायलनं येमेनमधील हल्ला केला. या हल्ल्यात हौथीच्या आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या माहितीनुसार चार जणांचा मृत्यू तर २९ जण जखमी झाले आहेत.
इस्रायलच्या हवाई दलानं (IAF) नुकतेच येमेनमधी हौथीच्या ताब्यात असलेल्या प्रदेशावर हल्ला केला. यामध्ये उर्जा प्रकल्पासह सागरी बंदराचा समावेश आहे. या हल्ल्याची माहिती इस्रायलच्या सुरक्षा दलानं एक्स मीडियावर शेअर केली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले, "हवाई दलानं हौथी दहशतवाद्यांशी संबंधित असलेल्या येमेनमध्ये हल्ला केला. त्यांनी इस्रायलवर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे."
हा संदेश नाही तर कृती-पुढे इस्रायच्या हवाई दलानं म्हटलं, " कारवाईत हौथी दहशतवाद्यांकडून इराणमधील शस्त्रांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या सागरी बंदरासह काही उर्जा प्रकल्पांचा समावेश आहे. आम्ही इस्रायलच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध आहोत. इराणकडून मिळणाऱ्या दिशानिर्देशानुसार आणि पैशांच्या मदतीनं हौथी इस्रायलवर सातत्यानं हल्ले करत आहे. इस्रायलच्या नागरिकांच्या संरक्षणासाठी अचूक हल्ले कसे करायचे, हे आम्हाला माहित आहे. नागरिकांच्या सुरक्षेकरिता पावले उचलायची, असा सुरक्षा दलाचा निर्धार आहे. हा संदेश नाही तर कृती आहे. लेबेनॉनमधील हल्ल्याच्या वेळी हिजबुल्लाहकडून नागरिकांचा वापर ढालसारखा करण्यात येतो."