इस्लामाबाद Imran Khan : पाकिस्तानच्या एका न्यायालयानं आज माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावलीय. गैर-इस्लामिक लग्न केल्याप्रकरणी न्यायालयानं दोघांनाही सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. इम्रान खानच्या पत्नीचे पहिले पती खावर मनेका यांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला होता. दोन लग्नांमधील अनिवार्य वेळ पाळण्याच्या इस्लामिक प्रथेचं उल्लंघन केल्याचा आरोप मनेकांनी केला होता.
इम्रान खानला 2022 नंतर चौथ्यांदा कोर्टाकडून शिक्षा : बुशराच्या माजी पतीनं इस्लामिक प्रथेचं उल्लंघन केल्यामुळं त्यांच्या लग्नावर प्रश्न उपस्थित केले होते. याप्रकरणी कोर्टानं प्रदीर्घ उलटतपासणीनंतर आरोप खरे ठरवत इम्रान आणि बुशराला दोषी ठरवलंय. तसंच न्यायालयानं इम्रान आणि बुशरा यांना आर्थिक दंडही ठोठावलाय. उल्लेखनीय बाब म्हणजे 71 वर्षीय इम्रान खान यांना 2022 नंतर चौथ्यांदा शिक्षा झालीय. याच आठवड्यात इम्रा यांना गोपनीय राजनयिक दस्तऐवज प्रकरणात 10 वर्षांचा तुरुंगवास आणि तोशाखाना प्रकरणात 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय. 8 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी न्यायालयाचा हा निर्णय इम्रान खान यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय.