नवी दिल्ली : गेल्या वर्षभरापासून भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध तणावपूर्ण राहिले आहेत. कुख्यात खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याची कॅनडात गोळ्या झाडून हत्या झाल्यानंतर हा तणाव वाढला. घटना घडली तेव्हा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी या हत्येमध्ये भारताचा हात असल्याचा गंभीर आरोप केला. तसंच, यासंदर्भात आम्ही सखोल चौकशी करत असल्याचंही ते म्हणाले होते. भारतानं यावर पुरावे द्यावे, आम्ही कारवाई करू, असं म्हटलं. पण कॅनडानं त्यावर सबळ पुरावे सादर केले नाहीत. तसंच स्वत: जस्टिन ट्रुडो यांनी आता 'आरोप करताना आमच्याकडं पुरावे नव्हते', असं म्हटलंय. दरम्यान, यासर्व प्रकरणावरुन आता भारतानं ट्रुडो यांना फटकारलं आहे.
जस्टिन ट्रुडो काय म्हणाले? : ट्रुडो यांनी हरदीप सिंग निज्जर हत्या प्रकरणातील भारताच्या सहभागाबाबतचे आरोप केवळ गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे केल्याचं कबूल केलंय. या सर्व प्रकारासंदर्भात कॅनडाच्या अंतर्गत चौकशी समितीसमोर सविस्तर माहिती देताना ट्रुडो म्हणाले, “घटना घडली तेव्हा मला हे सांगण्यात आलं होतं की कॅनडामधून आणि आमच्या इतर पाच मित्र देशांमधून आलेल्या गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनुसार, हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचं आढळून येतंय. ही माहिती मिळाल्यानंतर आम्ही तातडीनं भारत सरकारशी संवाद साधला. भारत सरकारनं आमच्याकडे याविषयीचे पुरावे मागितले. पण तेव्हा आमच्याकडे सबळ पुरावा नव्हता, तर केवळ गुप्तचर यंत्रणेकडून आलेली माहिती होती. त्यामुळे आम्ही भारताला सांगितलं की आपण एकत्र मिळून तुमच्या सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेऊ, कदाचित आपल्याला तिथे पुरावे सापडतील,” असंही ट्रुडो यांनी नमूद केलं.