नवी दिल्ली Sheikh Hasina Son : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना आपलं पद सोडावं लागल्यानं अवामी लीग हा पक्ष मोठा अडचणीत सापडला आहे. बांगलादेशात अराजक माजल्यानं शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला आहे. मात्र आम्ही अद्याप संपलो नाही. अवामी लीग पक्ष पुन्हा उभारी घेईल, असा एल्गार शेख हसीना यांचा मुलगा सजीब वाझेद जॉय यांनी ईटीव्ही भारतसोबत केलेल्या खास संवादात केला. अवामी लीग पक्ष लवकरच मोठी पुन्हा एकदा उभा राहून काम करेल, असा आशावादही त्यांनी यावेळी केला.
बांगलादेशात मोठा हिंसाचार :बांगलादेश सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळल्यानंतर अवामी लीगच्या नेत्या तथा पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेशातून भारतात पळ काढला. सोमवारी दिल्लीत दाखल झालेल्या शेख हसीना या सध्या राजधानीत सुरक्षीतस्थळी आहेत. शेख हसीना यांच्यासोबत त्यांची बहीण शेख रेहाना या सुद्धा आहेत. शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर बांगलादेशात मोठं आराजक माजलं आहे. त्याचे परिणाम जागतिक पातळीवर उमटत आहेत.
बांगलादेशात हिंसाचार, सुरक्षा दलांच्या जवानांवर हल्ले :"बांगलादेशात उफाळलेला हिंसाचार अनिश्चित काळासाठी चालणार आहे. हल्ले होत असल्यानं पोलिसांनी त्यांच्या चौक्या सोडून पळ काढला आहे. सुरक्षा दलाचे जवान परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ढाक्याच्या बाहेर आमच्या पक्षाला लक्ष्य करण्यासाठी खूप हिंसाचार चालू आहे. अल्पसंख्याकांचं संरक्षण करण्याचा प्रयत्न केला जाईल, मात्र हा मोठा देश आहे, त्यामुळे सगळीकडं त्यांचं रक्षण करू शकत नाहीत,” असं सजीब वाजेद जॉय यांनी यावेळी स्पष्ट केलं.
शेख हसीना यांचा दिल्ली सोडण्याचा विचार नाही :बांगलादेशात हिंसाचार उफाळून आल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला. शेख हसीना यांनी दिल्लीत आश्रय घेतला आहे. याबाबत बोलताना त्यांचा मुलगा सजीब वाजेद जॉय हे म्हणाले की, " बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना या नवी दिल्लीत आश्रयाला आहेत. दिल्लीतून इतर ठिकाणी जाण्याचा शेख हसीना यांचा कोणताही विचार नाही. शेख हसीना या आमच्या पक्षातील नेत्यांच्या संपर्कात आहेत. सुरुवातीला राजकारण विसरण्याचा आम्ही निर्णय केला, मात्र आमच्या पक्षातील नागरिकांवर हल्ले होत आहेत. आमच्यावर हल्ले होत असल्यानं त्यांना सोडून देऊ शकत नाही."
अवामी लीग हा सर्वात जुना पक्ष :बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी दिल्लीत आश्रय घेतला असून त्यांचं राजकीय पुनरागमन कधी होईल, याबाबत मोठी चर्चा करण्यात येत आहे. यावर त्यांच्या मुलाला विचारलं असता, त्यांनी अवामी लीग हा बांगलादेशातील सगळ्यात जुना आणि मोठा पक्ष आहे. आम्ही अद्यापही संपलेलो नाही. आम्ही कुठंही जाणार नाही. आम्ही पुन्हा उबारी घेऊ, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेख हसीना यांना मदत केली, त्याबद्दल त्यांचे आभार, असं म्हणत कृतज्ञता व्यक्त केली.
हेही वाचा :
- शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर चर्चेत आलेल्या खलिदा झिया कोण आहेत? नजरकैदेतून झाली सुटका - India Bangladesh Relations
- बांगलादेशच्या माजी पंतप्रधान भारतात दाखल, इंग्लंडकडं मागितला राजाश्रय - Bangladesh crisis protest update
- शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर बांगलादेशमध्ये अराजक स्थिती, विहिंपनं सरकारकडं केली 'ही' मागणी - bangladesh News